पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार हाय अलर्टवर असून, या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने गुरूवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकाराने आयोजन केलेल्या या बैठकीत काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षातील अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेच्या (ठाकरे) खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
दिल्लीत पार पडलेल्या बैठकीनंतर फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी फडणवीसांना ठाकरे गटाच्या अनुपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘शिवसेना ठाकरे गट देशाचा इतिहास विसरली याचे मला दु:ख आहे. या देशाचा असा इतिहास आहे की, जेव्हा युद्धपरिस्थिती असते किंवा देशावर झालेला हल्ला असतो, त्यावेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. बांगलादेशच्या युद्धादरम्यान देशात राजकीय पक्षांमध्ये टोकाचा संघर्ष होता. तरीही स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी स्व. इंदिरा गांधींना पूर्ण पाठिंबा दिला होता. ही या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशा स्थितीत विरोध करणे सुरु आहे, त्यांना देशाची जनता माफ करणार नाही. अशी टीका फडणवीसांनी ठाकरे गटावर केली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1915710909861028097
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गट उपस्थित नसल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.