मागच्या भागात आपण महाराष्ट्रातील दंगलींची पार्श्वभूमी जाणून घेतली होती.आता आजच्या भागात आपण आधुनिक काळात महाराष्ट्रात दंगली का घडतात? यामागे कोणकोणती कारणे आहेत? याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी दंगल म्हणजे काय? ते जाणून घेऊयात.
दंगल म्हणजे काय?
सामान्यपणे दंगल म्हणजे सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेक लोकांमध्ये होणारी मोठी झटापट, हाणामारी किंवा हिंसाचार. यात दोन गटांमध्ये तुफान मारामारी होते, दुकानांची तोडफोड, वाहनांची जाळपोळ, आणि पोलिसांवर हल्ले अशी घातक स्थिती निर्माण होते. जेव्हा जेंव्हा अशी स्थिती जेंव्हा निर्माण होते तेंव्हा त्या स्थितीला दंगल असे संबोधले.पण दंगल ही कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आता वरकरणी दंगल ही अचानक घडणारी घटना वाटत असली, तरी ती अनेकदा पूर्वीपासून तयार झालेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तणावांचे फलित असते. दंगल घडण्यामागे त्याआधीचे वातावरण, आणि लोकांच्या मनात साचलेला राग किंवा असंतोष यांचा मोठा वाटा असतो. आता दंगल का घडते? किंवा यामागे कोणकोणती संभाव्य करणे आहेत ते पाहूयात.
1. धार्मिक तणाव आणि ध्रुवीकरण (Religious Polarization)
धार्मिक ध्रुवीकरण म्हणजे समाजातल्या दोन किंवा अधिक धार्मिक गटांमध्ये जाणूनबुजून किंवा परिस्थितीमुळे निर्माण होणारा तणाव, द्वेष किंवा वैरभाव.हा तणाव अनेक वेळा राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक कारणांमुळे चिघळतो आणि त्याचा शेवट अनेकदा हिंसाचारात होतो. धर्माधारित अस्मिता आणि राजकीय पक्षांची त्यावर राजकारण करणे यामुळे समाजात कटुता वाढते.2000 नंतरच्या काही प्रमुख दंगलीं धार्मिक ध्रुवीकरणाचा थेट परिणाम होत्या. या घटनांमधून धार्मिक भावना, राजकीय हेतू, आणि प्रशासनाची भूमिका कशी परस्परांशी जोडलेली आहे हेही दिसून येते. उदाहरणच द्यायचे झाले तर 2018 मध्ये औरंगाबाद मध्ये झालेली दंगल ही दंगल एका झोपडपट्टीत पाण्याच्या नळांवरून घडली. त्याचे झाले असे की खान कॉलनी परिसरात. अनधिकृत पाणी कनेक्शन हटवण्यासाठी महापालिकेचे पथक आले होते, पण तिथल्या स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला त्यामुळे काही क्षणातच तणाव वाढला,मशिदीच्या आसपासच्या भागात हाणामारी झाली. नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले पण तोपर्यंत खूप नुकसान झाले होते.
2.सोशल मीडियाचा गैरवापर
सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. आज जवळपास प्रत्येकजण सोशल मिडीयावर आपला बहुतांश वेळ घालवताना दिसत आहे. खर तर हे खूप प्रभावी मध्यम आहे. कारण यामुळे एका क्षणात आपण हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतो. पण अनेकदा सोशल मीडियावरून धार्मिक भावना भडकवल्या जातात. भडकाऊ मेसेज / पोस्ट / व्हिडिओ तयार केला जातो. तो “फॉरवर्ड करा, पसरवा” अशा संदेशासह व्हायरल होतो. खरतर अफवा, फेक न्यूज, फोटोशॉप केलेले फोटो, आणि भडकाऊ व्हिडिओ सोशल मीडियावरून फार वेगाने पसरतात. तर काही गट त्याचा वापर करून जमावाला भडकवतात. लोकही अनेकदा त्यांच्यावर किंवा सोशल मिडियावरच्या पोस्टवर विश्वास ठेवून तात्काळ प्रतिक्रिया देतात, सत्यता तपासली जात नाही, त्यामुळे हिंसा उद्भवते. अनेकदा पोलिसांना ही बाब उशिरा कळते, पण तोपर्यंत नुकसान झालेले असते. याव्यतिरिक्त धार्मिक मिरवणुका, मशिदी किंवा मंदिरे यांच्याभोवतीचे वाद, विशेषतः “ध्वनी प्रदूषण”, “जागेचा वाद” इ. कारणांनी तणाव निर्माण होतो.उदाहरण: औरंगाबाद (2018), अमरावती (2021), भिवंडी अशा ठिकाणी अनेक दंगली धार्मिक वादांवरून झाल्या आहेत.
3.राजकीय हस्तक्षेप आणि मते खेचण्याचे राजकारण
राजकारण हे लोकशाहीचा भाग असले तरी काही राजकीय नेते मतांसाठी समाजात फूट पाडण्याचे, भावना भडकवण्याचे आणि द्वेष पसरवण्याचे हत्यार म्हणून त्याचा वापर करतात. निवडणुका जवळ आल्या की काही पक्ष जाणीवपूर्वक विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्यात तणाव निर्माण करतात.स्थानिक राजकारणी नेते आपली ताकद वाढवण्यासाठी कधी कधी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी निवडणुकीच्या काळात काही राजकीय नेते धार्मिक किंवा जातीय अस्मितेला भडकवून “वोट बँक” तयार करतात. त्यासाठी ते मुद्दामहून एखाद्या समाजाविरुद्ध वक्तव्ये करतात, ज्यातून दंगलसदृश वातावरण तयार होते. खरतर राजकीय स्वार्थासाठी धार्मिक, जातीय किंवा सामाजिक मुद्द्यांचा वापर करून समाजात फूट पाडणे ही दंगल घडवण्याची सगळ्यात धोकादायक पद्धत आहे. लोकशाहीच्या नावाखाली जर समाजात हिंसा पेरली गेली, तर ती संपूर्ण देशाच्या शांततेसाठी घातक ठरते.
4.सामाजिक विषमता आणि जातीपातीतून उद्भवणारे संघर्ष
भारतासारख्या विविध सामाजिक रचनेच्या देशात, जात-पात आणि सामाजिक विषमता या गोष्टी समाजाच्या मुळाशी असलेल्या समस्या आहेत, त्या दंगलींसाठी एक प्रकारची विस्फोटक पार्श्वभूमी तयार करतात. जातीआधारित तणाव अजूनही ग्रामीण आणि नागरी भागात दिसून येतो.मराठा, दलित, ओबीसी यांच्यातील आरक्षणाच्या मागण्या, सन्मानाचा मुद्दा यावरून संघर्ष होतो.उदाहरण: कोरेगाव-भीमा दंगल (2018) दलित आणि मराठा समुदायांमधील तणाव. तसेच काही राजकीय गट जातीय अस्मितेला भडकवून समाजात फूट पाडतात. त्यातून एकमेकांविरोधात द्वेष पसरतो त्यामुळे मग हिंसक चकमकी उद्भवू शकतात.शिवाय जातीविषयक अफवा, अपप्रचार, आणि भावनिक संदेश सोशल मीडियावर झपाट्याने पसरतात.पण हे संदेश लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करतात, त्यामुळे हिंसा उसळण्याची शक्यता वाढते.
5. पोलीस प्रशासनाची कमजोरी आणि राजकीय दबाव
दंगल नियंत्रणात आणण्यासाठी वेळेवर किंवा तटस्थपणे कारवाई केली जात नाही.अनेकदा पोलीस राजकीय दबावाखाली काम करताना दिसतात.यामुळे दंगलखोरांचा आत्मविश्वास वाढतो.अनेकदा दंगल होण्याच्या शक्यतेविषयी आधीच माहिती असूनही पोलीस यंत्रणा वेळेवर योग्य ती तयारी करत नाही. मनुष्यबळ, शस्त्रसज्जता, आणि तांत्रिक साधनांचा अभाव असतो.अशा पुरेशा तयारीचा अभावामुळे दंगलीवर नियंत्रण मिळवणे कठीण बनते. दंगल सुरू झाल्यावर पोलिसांची त्वरित आणि निर्णायक कृती होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर कठोर कारवाई न झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होतो.
याव्यतिरिक्त अनेकदा काही राजकीय पक्ष किंवा नेते आपले गट मजबूत करण्यासाठी जातीय-धार्मिक द्वेष निर्माण करतात.तसेच राजकीय व्यक्तीकडून दंगलखोरांना संरक्षण मिळते. काही वेळा राजकीय नेते त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्ष किंवा थेट संरक्षण देतात. यामुळे गुन्हेगारांना भीती वाटत नाही, आणि ते हिंसाचारात सहभागी होतात.कधीकधी राजकीय नेते पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना कारवाईपासून रोखू शकतात.यामुळे पोलिसांची स्वायत्तता कमी होते आणि ते निष्क्रिय राहतात. दंगल ही राजकीय उद्देशातूनही घडत असते काही वेळा निवडणूक जिंकण्यासाठी किंवा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय पक्ष दंगलींना खतपाणी घालू शकतात. त्यामुळे दंगल एक सामाजिक नव्हे तर राजकीय साधन बनते.
6. आर्थिक कारणे आणि बेरोजगारी
बेरोजगार युवक हताश असताना त्यांचा वापर करणे सोपे होते. तर काही वेळा आर्थिक कारणांवरून दंगल होते. कामधंदा नसल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य, असंतोष आणि चिडचिड वाढते.असे तरुण सहजपणे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जातो.राजकीय किंवा धार्मिक नेते अशा तरुणांना दंगलीसारख्या हिंसक प्रकारांमध्ये ढकलू शकतात. तर कधीकधी अत्यंत गरीब वर्गाला वाटते की, समाजात त्यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत.त्यांना वाटते की, काही विशिष्ट वर्ग, धर्म किंवा जातीला सरकारकडून अधिक सवलती मिळत आहेत. ही असमानता त्यांच्या मनात द्वेष निर्माण करते. बेरोजगार लोकांमध्ये बऱ्याचदा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांची संख्या जास्त असते.अशा लोकांना फेक न्यूज, अफवा, धार्मिक किंवा जातीय द्वेषमूलक विचारसरणी लवकर प्रभावीत करते.परिणामी, ते दंगलखोरांच्या मागे जातात. तर अनेकदा काही राजकीय गट बेरोजगार तरुणांना पैसा, मदत किंवा आश्वासने देऊन दंगलीसाठी “मोल-मजुरी”वर वापरतात. हीच बेरोजगारी त्यांना बळी बनवते.
7.संस्कृतीविषयक वाद / इतिहासाची मांडणी
अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज, अयोध्या किंवा औरंगजेब यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरून वाद निर्माण होतो.‘कोणाचा वारसा कोणाचा नाही’ हे वाद धार्मिक-राजकीय रंग घेतात. मंदिरे, मशीदी, स्तूप यांसारख्या धार्मिक स्थळांवरील ऐतिहासिक दावे व त्यावरील वाद हे दंगलीसाठी नेहमीच धोकादायक ठरले आहेत.
तर एखाद्या धार्मिक स्थळाचा इतिहास चुकवून सांगितल्यास किंवा त्यावर जबरदस्तीने मालकी सांगितल्यास सामाजिक तणाव वाढतो.आपली संस्कृती धोक्यात आहे” अशी भावना निर्माण करून काही शक्ती इतर धर्म किंवा गटांविरोधात द्वेषभावना पसरवतात. यामुळे देखील दंगलसदृश परिस्थिती निर्माण होते. याव्यतिरिक्त शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात इतिहास किंवा संस्कृतीशी संबंधित बदल झाल्यास काही समुदायांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते. मग यावरून आंदोलन, निषेध आणि काही वेळा दंगलीही उसळतात. एकूणच इतिहास आणि संस्कृती या भावना, गर्व आणि ओळख यांच्याशी निगडित असतात. त्यामुळे त्यांची चुकीची मांडणी किंवा उपयोग भावना भडकवण्यासाठी केला गेला, तर तो सामाजिक शांततेसाठी घातक ठरतो.
8. भौगोलिक-शहरीकरणाचा परिणाम
भौगोलिक घटक आणि शहरीकरण हेही दंगल घडवण्यामागील एक महत्त्वाचे, पण बऱ्याच वेळा दुर्लक्षित कारण असते. शहरीकरणामुळे समाजाची रचना, नातेसंबंध, आणि संसाधनांवरील स्पर्धा या सगळ्यात मोठे बदल होतात आणि हेच काही वेळा संघर्षांना जन्म देतात. झोपडपट्ट्या आणि निमशहरी भागांमध्ये विविध समाजगट, धर्म, जाती आणि भाषिक गट एकत्र राहत असतात. पण कधीकधी ही घनता आणि विविधता सामाजिक सौहार्द टिकवायला कठीण बनते, त्यामुळे थोडीशी चूकही मोठ्या संघर्षात बदलू शकते.तसेच झोपडपट्ट्या किंवा अतिक्रमित भागांमध्ये सीमांची स्पष्टता नसते, त्यामुळे शेजारील समुदायांमध्ये जमीन, पाणी, वीज यावरून वाद होतात. तर कधीकधी लहानशा वादातून मोठा संघर्ष होतो.पायाभूत सुविधा कमी असलेल्या भागांमध्ये संतापाचा स्फोट होणे सोपे असते.अशा भागात पोलिसांची उपस्थितीही कमी असल्यामुळे, तणाव जलद गतीने हिंसाचारात बदलतो.
एकूणच दंगल ही अपघात नसून अनेक सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय घटकांची संगनमताने घडणारी घटना आहे.ती कधीच अचानक घडत नाही, तर ती मनामनात साठलेल्या द्वेषातून आणि समाजातील असंतुलनातून जन्म घेते. म्हणून, समजूतदारपणा, संवाद, आणि शांतता हेच यावरचे खरे उत्तर आहे.
या सिरीजचा पुढचा भाग- भाग ४ – महाराष्ट्रातील काही प्रमुख दंगली