शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे एक वरिष्ठ जनरल अधिकारी यांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा लेफ्टनंट जनरल यारोस्लाव मोस्कलिक एका कारजवळून जात होते. तेव्हा त्या कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात यारोस्लाव मोस्कलिक यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
रशियाने या हल्ल्यासाठी युक्रेनला जबाबदार धरले आहे. त्याआधी गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले केले होते. त्याचा बदला म्हणून युक्रेनने हा हल्ला घडवून आणला असल्याचे बोलले जात आहेत.
एका वृत्तानुसार, रशियाने आपल्या लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल करत या प्रकरणाची चौकशी देखील सुरु आहे. हा स्फोट रिमोट बॉम्बने घडवला गेला असल्याचेही सांगण्यात येत आहे. तपास समितीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितले की, ‘बालाशिखा शहरात फोक्सवॅगन गोल्फ कारमध्ये झालेल्या स्फोटात यारोस्लाव मोस्कलिक यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, ‘स्फोटानंतर घटनास्थळी IED (Improvised Explosive Device) वापरल्याचे पुरावे देखील सापडले आहेत.
या स्फोटानंतर रशियाच्या तपास अधिकाऱ्यांनी युक्रेनवर दहशतवादी कारवायांचा आरोप केला आहे. रशियाने अधिकृतपणे या स्फोटामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केलेला नाही. पण रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या स्फोटाचे वर्णन दहशतवादी हल्ला असे करण्यात आले आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी रशियात हा स्फोट झाला आहे. अशास्थितीत रशियाने या हल्ल्याला युक्रेनला जबाबदार धरले आहे. दुसरीकडे मात्र, युक्रेनने अजूनतरी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केली आणि त्यांना शांतता राखण्यास सांगितले होते. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते की, “युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे मी खूश नाही. ते आवश्यक नव्हते आणि तो खूप चुकीचा काळ होता. दर आठवड्याला ५००० सैनिक मरत आहेत. शांतता करार करूया.’
रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात नऊ जण ठार झाले आहेत तर ६३ जण जखमी झाले आहेत.