पुण्यात बदलीसाठी माझ्याकडे येता, मुख्यमंत्र्यांकडे जाता, अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचे आहे पण त्यांना काम करायला नको असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विधानभवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार बोलत होते.
बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून १६५ कोटी निधी आला असून, यामधून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबतची सद्यस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आयुक्तांना विचारली असता त्यावर पालिका आयुक्तांनी या जागेवरील राडारोडा काढून जागा मोकळी झाली नसल्याचे सांगितले. त्यावरून अजित पवार चांगलेच चिडले आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.
अनेक अधिकारी दहा-दहा वर्षे पुण्यात काढतात. आमचे काहीही म्हणणे नाही. तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. पण पुण्यात पोस्टिंग दिली तर चांगले काम करायला नको का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. विकास काम रखडण्यामागे तुम्ही जबाबदार आहात. राखडलेली कामे लवकरात लवकर करा अन्यथा तुम्ही 31 मे रोजी निवृत्त होणार असाल तरीदेखील तुमची बदली करेन, मी येथून मुंबईला जाण्याअगोदर तुमच्या बदलीची ऑर्डर आली असेल, असे सांगत पालिका आयुक्तांना इशारा दिला आहे.