काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील वक्तव्याशी संबंधित मानहानी प्रकरणात आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वीर सावरकरांच्या एका नातेवाईकाने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.
लंडन दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांना न्यायालयाने ९ मे २०२५ रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
लंडन येथे मार्च २०२३ मध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणात राहुल गांधींना आधी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
मार्च 2023 मध्ये राहुल गांधी यांनी लंडनमधील भाषणात सावरकरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावेळी राहुल गांधींनी म्हंटले होते, “एका पुस्तकात लिहिले आहे की सावरकर आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी एकदा एका विशिष्ट समुदायातील माणसाला मारहाण केली. त्यावेळी सावरकर यांना आनंद झाला होता.” प्रत्यक्षात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यानुसार सावरकरांबद्दल असे कुठल्याही पुस्तकात लिहिले नाही, असे सावरकरांचे नातू सात्यकी यांनी याचिकेत म्हटले आहे.