Nitesh Rane: पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. विशेषत: या हल्ल्यात धर्म विचारून केवळ हिंदूंना टार्गेट केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
“हिंदू लोकांनी कोणत्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे. दुकानदाराला हनुमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका” असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात एका जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते.
“दहशतवाद्यांनी मारण्याआधी आपल्या लोकांना धर्म विचारला. म्हणून हिंदुंनी सुद्धा काही विकत घ्यायच्या आधी त्यांना धर्म विचारला पाहिजे. ते तुम्हाला तुमचा धर्म विचारुन मारत असतील, तर तुम्ही सुद्धा सामान खरेदी करण्याआधी त्यांचा धर्म विचारला पाहिजे,” असेही राणे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, हिंदू संघटनांनीही अशी मागणी केली पाहिजे.
दरम्यान, यापूर्वीही मंत्री नितेश राणे यांनी ‘मल्हार प्रमाणपत्र’ हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व मांसाची दुकाने हिंदू चालवतील असे त्यांनी म्हटले होते. तसेच हिंदू लोकांनी केवळ हिंदू लोकांकडूनच मटण खरेदी करावे, असेही आवाहन त्यांनी केले होते. यासाठी केवळ हिंदू लोकांना मल्हारप्रमाणपत्र देण्यात येणार होते.