Pahalgam Terrorist Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. परंतु सोलापूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूरमधील एका तरूणाने दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते लक्ष्मण बबन साखरे यांनी या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या तक्रारीत नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण साखरे यांचे मित्र नागेश पंडीत वाळुंजकर (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) यांनी साखरे यांना सांगितले कि, मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे.
त्यानंतर साखरे यांनी 25 एप्रिल रोजी सकाळी 08.45 मिनिटांनी त्या स्टेस्टचा फोटो त्यांच्या मोबाईलवर नागेष वाळुंजकर याच्याकडून मागवून घेतला. त्यांनी त्या स्टेटसच्या फोटोची पाहणी केली. हे आक्षेपहार्य स्टेटस अजहर असिफ शेख रा. शेलगाव वांगी याने त्याच्या मोबाईलवर व्हॉटस्अपला ठेवले होते. हा सगळा प्रकार आक्षेपहार्य असल्याचे लक्षात येताच साखरे यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ अंतर्गत संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या स्टेटसद्वारे समाजात तेढ निर्माण करणे, एका समूहाविरुद्ध चिथावणी देणे, लोकांमध्ये भीती पसरवणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.