India Vs Pakistan: २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे भारताने पाकिस्तानसोबतच्या ‘सिंधू जल करारा’ला स्थगिती दिली आहे. परंतु पाकिस्तानने भारताच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही सिंधू जल करारावरून भारताला थेट इशार दिला आहे. “भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर भारताच्या हल्ल्याचे आम्ही पण उत्तर देणार”, असे ते म्हणाले आहेत. “सिंधु नदी आमचे जीवन आहे. आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहोत”, असेही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले आहे
“कोणत्याही चुकीच्या कृत्याला किंवा धाडसाला उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असा इशारा शरीफ यांनी दिला आहे. पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे आणि आम्ही आमच्या शूर सैन्याच्या पाठीशी उभे आहोत. शांतता आमचे प्राधान्य असले तरी आम्ही आमच्या अखंडता आणि सुरक्षेशी तडजोड करणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनीही आक्रमक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत सिंधु कराराच्या निर्णयावरुन भारताला धमकी दिली आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांनी एक्सवरती पोस्ट करत लिहिले आहे की, “मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की, सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहील.”
एकंदरित, पाकिस्तान सिंधू जल कराराच्या भारताच्या भूमीकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि गरज पडल्यास युद्ध करू असा इशाराही अप्रत्यक्षपणे देत असल्याचे दिसत आहे.