केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी (२६ एप्रिल २०२५) सर्व माध्यम वाहिन्यांना संरक्षण कारवायांचे आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण न करण्याचे आवाहन केले आहे.
या संबंधित एक अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. अहवालात ‘राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना, संरक्षण आणि इतर सुरक्षा ऑपरेशन्सशी संबंधित बातमी देताना जबाबदारीने काम करण्याचा व कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.’
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार दहशतवादाविरोधी कारवाया करण्याच्या योजना आखत आहे. याचदरम्यान, वृत्तवाहिन्या, संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित कोणत्याही माहितीचे रिअल-टाइम कव्हरेज, दृश्यांचा प्रसार किंवा वृत्तांकन करत असतील तर त्यांना हा इशारा देण्यात आला आहे.
‘संवेदनशील माहितीचे प्रसारण, विरोधी घटकांना मदत करू शकते तसेच यामुळे सैनिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.’ असे सादर केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे.
भूतकाळातील घटनांची आठवण करून देत मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘कारगिल युद्ध, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला व कंधार अपहरण यासारख्या काही घटनांमध्ये, अनिर्बंध कव्हरेजमुळे राष्ट्रीय हितांवर अनपेक्षित प्रतिकूल परिणाम झाले होते.
https://x.com/MIB_India/status/1916070991744139269
“राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म आणि व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. कायदेशीर जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त, आपल्या सामूहिक कृतींमुळे चालू असलेल्या ऑपरेशन्स किंवा आपल्या सैन्याच्या सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खात्री करणे ही एक सामायिक नैतिक जबाबदारी आहे.’ असे अहवालात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी अनेकवेळा, मंत्रालयाने सर्व टीव्ही वाहिन्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (सुधारणा) नियम, २०२१ च्या नियम ६(१)(पी) चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.