Pahalgam Terrorist Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातीलच एक निर्णय म्हणजे भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात ५०२३ पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. यातील केवळ ५१ पाकिस्तानी नागरिकांकडे वैध व्हिसा आणि कागदपत्रे आहेत. तर १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात सध्या पाकिस्तानी नागरिकांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीची चौकशी आणि पडताळणी केली जात आहे.
सर्वात जास्त पाकिस्तानी नागरिक नागपूर शहरात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरात सध्या २४५८ पाकिस्तानी नागरिक आहेत. ठाणे शहरात ११०६,नवी मुंबईत २३९, पिंपरी-चिंचवडमध्ये २९०, जळगावमध्ये ३९३, मुंबईत १४, तर पुणे शहरात १११ पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इतर काही शहरातही पाकिस्तानी नागरिक आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत की, कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा जास्त राज्यात थांबू नये. जे जास्त काळ थांबताना आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.