Palgam Terrorist Attack: पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. विशेषत: या हल्ल्यात धर्म विचारून केवळ हिंदूंना टार्गेट केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आता भारताने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यातच दहशतवाद्यांविरूद्ध एक महत्वपूर्ण पुरावा समोर आला आहे.
या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते आणि ते प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु आता हे संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा एका महाराष्ट्रातील पर्यटकाने केला आहे आहे. त्यांनी या संदर्भातील माहिती एनआयएला दिली आहे.
मावळचे पर्यटक श्रीजीत रमेश हे हल्ल्याच्या दिवशी पहलगामध्येच होते. ते आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेले होते. पहलगाममध्ये असताना ते आपल्या मुलीचा व्हिडीओ काढत होते, तेव्हा हे संशयित दहशतवादीही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ आता एनआयएकडे सोपावला आहे. आता पुढील तपासाला देखील सुरुवात झाली आहे.
श्रीजीत रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते, तेव्हा त्यांना असे वाटले की यांना कुठेतरी पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे पहलगाममधील सर्व व्हिडीओ तपासून पाहिले. त्यातील त्यांच्या मुलीच्या व्हिडीओमध्ये पाठीमागे दोन दहशतवादी दिसले. आता याबाबत तपास सुरू असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येईल.