Dr Shirish Valsangkar News: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी रात्री ८. ३० वाजता स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. सोलापूरमधील मोदी परिसरात असलेल्या त्यांच्या घरातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या मनीषा माने नावाची महिला न्यायलयीन कोठडीत आहे. तसेच डाॅक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन, डाॅक्टरांची सून शोनल वळसंगकर यांचीही चौकशी करण्यात आली आहे. परंतु या आत्महत्येला जबाबदार कोण, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईलचा सीडीआर मिळवला आहे. या सीडीआरमध्ये, ज्या दिवशी डॉक्टरांनी आत्महत्या केली, त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर एकूण २७ कॉल्स आले होते, असे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे वळसंगकर यांनी आत्महत्येच्या अगदी काही मिनिटे आधी म्हणजेच रात्री आठ वाजल्यानंतर चार वेगवेगळ्या व्यक्तींना फोन केल्याचे सीडीआरमधून स्पष्ट झाले आहे. आता हे चार व्यक्ती कोण होते आणि त्यांच्यात काय संभाषण झाले, याचा कसून तपास सुरू आहे. कारण या काॅल्समधून आत्महत्येला जबाबदार कोण याचे धागेदोरे पोलिसांना मिळू शकतात.
आता मनिषा मानेचे वकिल अॅड. प्रशांत नवगिरे हे आत्महत्येपूर्वीच्या या काॅल्सचा मुद्दा न्यायालयात मांडणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आता या काॅल्समधून पोलिसांना काय माहिती मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.