महाराष्ट्रातील धार्मिक दंगलींचा इतिहास अत्यंत गुंतागुंतीचा आणि संवेदनशील आहे. या दंगलींमध्ये अनेक वेळा समाजातील विविध गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि शांतता धोक्यात आली आहे. आजच्या या भागात आपण महाराष्ट्रातील ५ मोठ्या आणि प्रमुख दंगलींची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
1. भिवंडी दंगल (1970)
1970 साली भीवंडीमध्ये घडलेली दंगल महाराष्ट्राच्या सामाजिक व धार्मिक इतिहासातील एक अत्यंत भीषण घटना होती. या दंगलीत प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम समुदायांमधील तणावाचा स्फोट झाला होता.ज्यामध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
भिवंडी हे मुंबईच्या जवळचे एक औद्योगिक शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्त्रोद्योग व्यावसायिक आहेत. 1970 मध्ये शिवसेनेने राम नवमीच्या दिवशी शहरातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मात्र या मिरवणुकीचा मुस्लिम समुदायाने विरोध केला कारण ती त्यांच्या मुख्य भागातून जात होती. खरतर मुस्लीम समुदायाच्या विरोधातूनच दंगलीची पहिली ठिणगी पडली. यावेळी दोन्ही समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला, आणि याचे पर्यवसान हिंसाचारात झाले. त्याच वेळी भिवंडी, जळगाव, आणि मालेगाव या ठिकाणी एकाच वेळी दंगली उसळल्या.यामध्ये 400 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो लोक जखमी झाले. मोठ्या प्रमाणात घरे, दुकाने, मशिदी, आणि मंदिरे जाळली गेली.हजारो लोक विस्थापित झाले आणि शहराचा सामाजिक समतोल बिघडला.
महाराष्ट्र सरकारने गुंडगिरी आणि धार्मिक उन्माद रोखण्यासाठी कडक पावले उचलली.सांप्रदायिक तणाव नियंत्रणासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाची मदत घेतली खरी पण या दंगलींनी महाराष्ट्राच्या धार्मिक सहिष्णुतेवर मोठा आघात केला.ही घटना आजही धार्मिक सहजीवनावर कसा विपरीत परिणाम होतो याचे उदाहरण म्हणून अभ्यासली जाते.
2. मुंबई दंगल(1992-93)
मुंबई दंगल ही भारताच्या इतिहासातील एक काळी घटना आहे, या दंगलींमुळे मुंबई शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संरचनेत खोलवर बदल झाले.६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात धार्मिक तणाव निर्माण झाला. मुंबईत या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली, ज्यामुळे ६ ते १० डिसेंबर दरम्यान दंगल उसळली. यानंतर जानेवारी १९९३ मध्ये दुसऱ्या टप्प्यात दंगल भडकली. या दंगलीत सुमारे ९०० लोक मृत्यूमुखी पडले, ज्यात ५७५ मुस्लिम, २७५ हिंदू आणि ५० इतरांचा समावेश होता.तर २,०३६ हून अधिक लोक जखमी झाले.यामध्ये दुकाने, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे, दंगलींनंतर १९९३ मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडले, ज्यामुळे आणखी तणाव निर्माण झाला.
१९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. या आयोगाने ५ वर्षे चौकशी केली आणि १९९८ मध्ये अहवाल सादर केला. अहवालात शिवसेना आणि त्याच्या नेत्यांना दंगलींसाठी जबाबदार ठरवले गेले. पोलिसांनी निष्कलंकपणे कारवाई केली आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले. तथापि, या अहवालाच्या शिफारसींना शासनाने मान्यता दिली नाही, ज्यामुळे न्यायप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. खरतर अशा घटना घडू नयेत यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या भावना आणि विश्वासांचा आदर केला पाहिजे हेच या दंगलीतून अधोरेखित होते. इतकी वर्षे उलटली पण आजही या दंगलींच्या जखमेचे निशाण मुंबईच्या विविध भागांत दिसून येतात.
3. मिरज दंगल (2009)
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातले एक शांत, सांस्कृतिक शहर म्हणजे मिरज. इथे वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लिम समाज गुण्यागोविंदानं नांदत होता. पण सप्टेंबर २००९ मध्ये, एका चित्राने, इतिहासाच्या एका दृश्याने मिरज पेटली आणि पुन्हा एकदा, धर्माचे राजकारण माणुसकीवर भारी ठरले. त्याचे झाले असे की मिरजमध्ये गणेशोत्सव दरम्यान दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराज आणि अफझलखानाच्या प्रतिकृतीचा देखावा मिरवणुकीत दाखवला जात होता. २००९ मध्ये, या प्रदर्शनामध्ये अफझलखानाच्या मृत्यूचे दृश्य अधिक स्पष्ट आणि उग्र स्वरूपात दाखवले गेले, ज्यामध्ये अफझलखानाचा शिरच्छेद दर्शवण्यात आला होता. या चित्रावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला कारण अफझलखानाला मुस्लिम समाजातील काही लोक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व मानतात, त्यामुळे हे चित्रण त्यांच्यासाठी अपमानजनक वाटले. खरतर अफजल खान हा काय स्वराज्याचा हितचिंतक नव्हता तर तो स्वराज्याचा दुष्मनच होता. त्यामुळेच शिवरायांनी त्याला अद्दल घडवली होती. असे सगळे असताना त्याचे महिमा मंडण करण्याची काहीच आवशकता नव्हती.पण तरीही काही कट्टरतावाद्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली की हे चित्रण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला “शिवाजी महाराजांचा इतिहास” म्हणून समर्थन दिले. त्यामुळे या वादातून परिसरात तणाव वाढला आणि काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ आणि हिंसक चकमकी घडल्या.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीवर निर्बंध आणले, पण दोन्ही बाजूंनी याला विरोध करण्यात आला.अखेरीस, पोलिसांनी लाठीचार्ज आणि अटकसत्र सुरू केले. काही ठिकाणी कर्फ्यूही लागू करण्यात आला. पण तोपर्यंत, शहराचे सौहार्द गमावून बसले होते. त्याच वेळी स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकीय नेते यात उडी घेत, वेगवेगळ्या गटांना पाठिंबा देत होते, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. काही ठिकाणी दंगल पुन्हा भडकू नये म्हणून मध्यस्थीचे प्रयत्न झाले. मिरजमध्ये आता पुन्हा एकदा पूर्वीसारखीच शांतता नांदते आहे. पण त्या जखमा आजही खोल आहेत. दंगल ही केवळ रस्त्यांवर होत नाही तर ती मनांमध्येही होते. जी कायमची ठसठसत राहते.
4. धुळे दंगल (2008)
सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील धुळे शहर एक भीषण आणि दु:खद घटनेचा साक्षीदार ठरले. ५ ऑक्टोबर २००८ रोजी, एका साध्याशा पोस्टरने भडकावलेली चिंगारी एका प्रचंड धार्मिक दंगलीत परिवर्तित झाली आणि शहरातील सामाजिक समरसतेला खोल जखमा देऊन गेली. धुळे शहरात काही हिंदुत्ववादी संघटनांनी काही पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्समध्ये काही इस्लामी दहशतवाद्यांचे फोटो आणि त्याखाली “आतंकवादाचा धर्म” असे वाक्य लिहिलेले होते. ह्या पोस्टर्सने मुस्लिम समाजामध्ये संताप उसळवला. त्यांनी तातडीने ती पोस्टर्स हटवण्याची मागणी केली, पण प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने परिस्थिती चिघळत गेली. बर हा तणाव वाढण्यामागे फक्त एवढेच कारण नव्हते तर यामागे इतरही काही कारणे होती.
धुळे शहराचे स्थानिक राजकारण या दंगलीच्या पार्श्वभूमीला आणखी गोंधळात टाकत होते. नगरपालिकेतील वर्चस्व, हिंदू आणि मुस्लिम समाजातील राजकीय गटबाजी, आणि निवडणूक जवळ आल्याने उधाण आलेले ध्रुवीकरण या सर्व घटकांनी वातावरण अधिकच तापवले. या पार्श्वभूमीवर काही भागात आंदोलन सुरु झाले. काही मुस्लिम युवकांनी पोस्टर्स फाडली. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चे काढले. एका बाजारात अचानक दगडफेक झाली आणि त्यानंतर हिंसेचा भडका उडाला.या दंगलीत पोलीस यंत्रणेचे अपयश प्रकर्षाने जाणवले. दंगल सुरू होण्यापूर्वीच तणाव जाणवत असताना, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दंगल सुरू झाल्यानंतरही आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कमी पडला. अनेक भागांत तासन् तास हिंसाचार चालू राहिला. शेवटी लष्कराला पाचारण करावे लागले. मात्र तोपर्यंत यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला, शेकडो लोक जखमी झाले दुकाने, घरे, वाहने जाळली गेली कोट्यवधींचे नुकसान झाले, सर्वात मोठे नुकसान झाले ते माणुसकीचे आणि विश्वासाचे. जे शेजारी एकमेकांच्या घरी सहज जात, त्यांच्यात भिंती निर्माण झाल्या. आता वर्षे लोटली या घटनेला पण या आठवणी धुळेकरांच्या मनातून पुसल्या गेल्या नाहीत.
5. मालेगाव दंगल (2015)
मालेगाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक संवेदनशील शहर, हे शहर गेल्या काही दशकांत धार्मिक दंगलींसाठी चर्चेत राहिले आहे. इथे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तणाव वारंवार उसळत राहिलेला दिसतो. त्यामुळे या शहरात अनेकदा दंगली घडल्या आहेत. पण २०१५ साली मालेगाव शहर पुन्हा एकदा धार्मिक दंगलीच्या आगीत जळून निघाले. त्रिपुरा राज्यातील एका घटनेच्या निषेधातून भडकलेली ही दंगल, मालेगावसारख्या संवेदनशील शहरात किती लवकर हिंसाचारात परिवर्तित होऊ शकते, याचे ज्वलंत उदाहरण होती. तारीख होती ऑक्टोबर २०१५, देशाच्या ईशान्येकडील त्रिपुरा राज्यात कथित मुस्लिमांवरील हल्ल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली होती. मालेगावमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने आंदोलन केले
हे आंदोलन सुरू असतानाच, काही ठिकाणी आक्रमक घोषणा, अफवांची भर आणि पोलिसांविरुद्ध रोष यामुळे वातावरण आणखीनच तापले. पाहता पाहता जमाव आक्रमक झाला, दगडफेक सुरू झाली, वाहने फोडली गेली, आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. हिंसाचार सुरु होताच पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुर सोडला आणि काही ठिकाणी हवेत गोळीबारही केला. मालेगावसह नांदेडमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या. यादरम्यान मालेगावमध्ये ५२ जणांना अटक करण्यात आली, कर्फ्यू लागू करण्यात आला. तसेच यामध्ये पोलिस आणि काही निष्पाप नागरिकही जखमी झाले. प्रशासनाने शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात केली. पण ही दंगल केवळ एका बाह्य घटनेवर प्रतिक्रिया होती का? तर नाही.
मालेगावमध्ये धार्मिक तणाव आधीपासूनच सतत धगधगत असल्याचे दिसून येते. १९६०, १९८०, २००१, २००६ आणि २०१५ प्रत्येक दशकात ही जमीन किती असुरक्षित आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. या दंगलीत शेकडो दुकाने, वाहने आणि मालमत्तेचे नुकसान झाले.जखमी नागरिक आणि पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक निर्दोष नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागला.
एकूणच महाराष्ट्रातील धार्मिक दंगलींचा इतिहास केवळ हिंसाचार आणि मृत्यू यांच्या आकडेवारीपुरताच मर्यादित नाही, तर तो समाजाच्या मनोवृत्ती, सहिष्णुतेच्या मर्यादा आणि राजकीय स्वार्थाच्या परिणामांची दाहक साक्ष आहे. १९७० च्या भीवंडी दंगलपासून ते २०१५ च्या मालेगाव हिंसेपर्यंत, आपण हे पाहतो की धार्मिक भावना, राजकीय हस्तक्षेप, आणि प्रशासनाचे अपयश यांनी मिळून सामान्य माणसाच्या आयुष्याला वेठीस धरले आहे.
या प्रत्येक दंगलीत मग ती भिवंडीतील धार्मिक मिरवणुकीवरून असो, मुंबईतील बाबरी मशीदच्या पडझडीची प्रतिक्रिया असो, की मिरजमधील इतिहासाच्या देखाव्यावरून उद्भवलेला वाद असो यातून मानवी रक्त सांडले गेले, विश्वास तुटले, आणि शांततेचे तुकडे झाले. प्रशासनाने अनेकवेळा उशिरा किंवा अपुरा प्रतिसाद दिला, तर राजकीय नेतृत्वाने अनेकदा परिस्थिती शांत करण्याऐवजी त्यातून फक्त आपले राजकीय समीकरण साधण्याचे काम केले.
या घटनांचा अभ्यास करताना हे लक्षात येते की, शांतता टिकवणे हे कोणत्याही सरकारचे, प्रशासनाचे किंवा संघटनेचे काम आहेच, पण त्याहून अधिक ते आपल्यासारख्या सामान्य नागरिकांचेही सामूहिक उत्तरदायित्व आहे. तसेच प्रत्येकाने एकमेकांच्या धर्मिक भावनेचा आदर करणे आवशक आहे. आजही या सर्व शहरांत पूर्वीच्या जखमा सतत ठसठसत राहतात काहींच्या मनात, काहींच्या आठवणीत, तर काहींच्या विस्कटलेल्या संसारात. या इतिहासातून शिकून पुढे जाणे हीच खरी प्रगती आहे.
या सिरीजचा पुढचा भाग- भाग- ५ दंगलीवर उपाय आणि पुढील वाटचाल