नुकतेच भारतीय नौदलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की जेव्हा मानवी जीवन संकटात असेल तेव्हा देशाची संरक्षण शक्ती ही तत्पर असेल. मग ते नागरिक शेजारच्या देशाचे असले किंवा शत्रू देशाचे असले तरी.न्याय समान असेल.
दिनांक 9 जून 2025 रोजी केरळच्या बेपोर किनाऱ्यापासून सुमारे ७८ नॉटिकल मैल अंतरावर, सिंगापूरच्या मालवाहतूक जहाजाला एमव्ही वान है ५०३ (MV Wan Hai 503) ला अचानक आग लागल्याचे दिसून आले. हे जहाज कोलंबोहून मुंबईला जात होते आणि त्यात एकूण २२ क्रू मेंबर्स होते. आणि मदतीसाठी हाक येताच भारतीय नौदल (Indian Navy) च्या INS सुरत या युद्धनौकेने केरळ किनाऱ्याजवळ जळत्या जहाजातून 18 जणांना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. INS सुरतने या जहाजावरील 22 पैकी 18 क्रू सदस्यांची सुटका केली.
ज्यात चीनचे ८, तैवानचे ४, म्यानमारचे ४ आणि इंडोनेशियाचे २ जण आहेत. हे जहाज कोलंबो (Colombo) येथून मुंबईकडे जात होते, यापैकी ६ क्रू मेंबर्स जखमी आहेत, त्यापैकी दोन – लू यानली (चीन) आणि सोनिटूर हेनी (इंडोनेशिया) यांची प्रकृती गंभीर आहे. इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींना मंगळुरू येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना स्थानिक हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर आपल्या नागरिकांचे प्राण वाचवत भारतीय नौदलाने बचाव मोहीम राबवल्याबद्दल चीनने भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार मानले आहेत. याबाबत भारतातील चीनचे राजदूत यू किंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत भारताचे आभार मानले आहेत.
या कठीण परिस्थितीत भारतीय नौदलाने केलेली जलद कृती शौर्य आणि मानवी करुणेचे उदाहरण ठरली.नौदलाने केलेले हे केवळ बचाव कार्य नव्हते, तर ते विश्वास आणि शौर्याचे प्रतीक होते.अश्या परिस्थितीमध्ये भारतीय युद्धनौका ज्या शत्रूच्या तोंडचे पाणी पळवतात.त्या आपल्या सक्षम उपकरणांसह संकटात सापडलेल्या शेजारच्या देशांच्या नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवून त्यांचे प्राण वाचवतात.हे पुन्हा एकदा समोर आले.
भारताच्या तिन्ही बाजूला विस्तीर्ण सागरी किनारा आहे. या सागरी सीमेवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षा करणे ही जबाबदारी भारतीय नौदलाची असते. सुरक्षेसाठी रोज टेहळणी मोहीम राबवली जाते.भारताच्या विस्तीर्ण अशा सागरी किनाऱ्याची सुरक्षा करणे खरे तर अति जिकिरीचे काम आहे. यासाठी नौदल आणि तटरक्षक दल डोळ्यात तेल घालून संयुक्तपणे मोहीम राबवतात. या टेहळणी मोहिमेत नौदलाची डोंनिअर विमाने अवकाशातून लक्ष ठेवतात तर, आधुनिक यंत्रांच्या माध्यमातून भारतीय हद्दीत संशयित असणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवले जाते.भारतीय नौदल सागरी क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यात तत्पर असते.
पण देशाचे भक्कमपणे संरक्षण करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्त्या आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत, भारतीय नौदल शेजारील देशांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असते. हे अनेक घटनांमधून समोर आले आहे.
या लेखात २०२० ते २०२५ दरम्यान भारतीय नौदलाद्वारे राबवण्यात आलेल्या परदेशी जहाजांच्या १० बचाव मोहिमांचा आढावा घेतला आहे.
केरळमध्ये लायबेरियाच्या बुडत असलेल्या मालवाहू जहाजावरील सर्व 24 क्रू सदस्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश
२५ मे २०२५ रोजी केरळमधील कोची किनाऱ्याजवळ लायबेरियातील मालवाहू जहाज MSC ELSA 3 बुडत असल्याचे समोर येताच भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाचे कर्मचारी या जहाजावर पोचले. हे जहाज ६४० कंटेनर कॅल्शियम कार्बाइड, डिझेल आणि फर्नेस ऑइलसह काही धोकादायक रसायनांनी भरलेले होते.मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि नौदलाने जहाजावरील सर्व २४ क्रू मेंबर्सना वाचवले. या जहाजावर रशिया, युक्रेन, जॉर्जिया आणि फिलीपिन्सच्या नागरिकांसह क्रू मेंबर्सची सुटका करण्यात आली. यावेळी ICG ने २१ क्रू मेंबर्सना वाचवले, तर उर्वरित तीन जणांना नौदलाच्या INS सुजाताच्या साहाय्याने वाचवण्यात आले.
भारतीय नौदलाने समुद्रात जखमी मच्छिमाराला वाचवले
४ मे २०२५ रोजी भारतीय युद्धनौका त्रिकंदने मध्य अरबी समुद्रात इराणी जहाजावर असलेल्या एका पाकिस्तानी मच्छिमाराला तातडीने वैद्यकीय मदत पुरवली होती. , ज्याचा हात गंभीर जखमी झाला होता.भारतीय नौदलाच्या जहाज (INS) त्रिकंदने इराणी बोट अल ओमेदी वरून आलेल्या आपत्तीच्या कॉलला उत्तर दिले आणि असे आढळले की मच्छीमाराच्या इंजिनवर काम करताना त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्याची प्रकृती गंभीर होती . हे कळताच त्रिकंद या युद्धनौकेने आपला मार्ग बदलला , आणि त्यानंतर या व्यक्तीला नुसतीच मदत नव्हे तर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
खरे पाहता पाकिस्तान हा भारताचा पारंपरिक शत्रू असून तो सतत भारतावर दहशतवादी हल्ल्यांच्या रूपात कुरघोड्या करत असतो. मात्र या प्रसंगात मानवतेच्या बाजूने कौल देत भारताने एका प्रकारे पाकिस्तानला आरसा दाखवला असे म्हणता येईल.
. भारतीय नौदलाने गोव्यात व्यापारी जहाजातील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय स्थलांतर केले
भारतीय नौदलाने २१ मार्च २०२५ रोजी सकाळी पनामाच्या मालवाहतूक करणाऱ्या जहाजावरील(एमव्ही हेइलन स्टार) एक गंभीर वैद्यकीय स्थलांतर (MEDEVAC) मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
या वेळी नौदलाने तीन क्रू सदस्यांना वाचवले, ज्यात दोन चिनी आणि एक इंडोनेशियन यांचा समावेश होता, तर आणखी एका क्रू सदस्याचा आधीच जखमी अवस्थेत मृत्यू झाला होता.२० आणि २१ मार्चच्या मध्यरात्री, मुंबईतील भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राने (एमआरसीसी) भारतीय नौदलाला एमव्ही हेइलन स्टारच्या चार क्रू मेंबर्सना गंभीर भाजलेल्या जखमी झाल्याची आणि त्यांना त्वरित प्रगत वैद्यकीय सेवा आवश्यक असल्याची माहिती दिली होती.
त्याला जलद प्रतिसाद देत, नौदलाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस दीपक या दोन जहाजांना मदत करण्यासाठी त्यांच्या चालू तैनातीतून वळवले. २१ मार्च रोजी सकाळी पहिल्या प्रकाशात विक्रांतहून आलेल्या सीकिंग हेलिकॉप्टरने “एमव्ही हेइलन स्टारमधून दोन चिनी आणि एक इंडोनेशियन नागरिक अशा तीन जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाकडून आव्हानात्मक ऑपरेशन केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
ह्या प्रसंगात आव्हानात्मक परिस्थिती असूनही, राष्ट्रीय सागरी सीमांच्या पलीकडेही मानवतावादी मदतीसाठी देण्यात जलद प्रतिसाद भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या अढळ वचनबद्धतेला अधोरेखित करते, असे भारत मंत्रालयाने आपल्या अहवालात नमूद केले होते.
आयएनएस तर्कश सोमालियाजवळील इराणी जहाजाला पुरवली मदत
१० मार्च २०२५ भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस तर्कशने हिंद महासागरात यशस्वीरित्या बचाव मोहीम पार पाडली, सोमाली किनाऱ्याजवळ एका इराणी जहाजाला आणि त्याच्या अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना मदत केली.
ने हिंदी महासागरात यशस्वीरित्या बचाव मोहीम पार पाडली, सोमाली किनाऱ्याजवळ एका इराणी जहाजाला आणि त्याच्या अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांना मदत केली.
तीव्र हवामानामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई आणि क्रू सदस्यांपैकी एकाला दुखापत झाल्यानंतर इराणी जहाजाने आपत्कालीन मदतीचा संदेश पाठवला होता. तातडीने प्रतिसाद देत, आयएनएस तर्कशच्या कर्मचाऱ्यांनी या जहाजावर पोचत बिघडलेला रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्लांट दुरुस्त केला आणि त्याचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववत केला. याव्यतिरिक्त, युद्धनौकेच्या वैद्यकीय पथकाने जखमी खलाशांना तात्काळ प्राथमिक उपचार दिले आणि त्यांची प्रकृती स्थिर झाली.
हे अभियान भारतीय नौदलाच्या हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या चालू प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामुळे समुद्रात मानवतावादी मदत आणि प्रादेशिक स्थिरतेत भारताची सक्रिय भूमिका यातून पुन्हा एकदा समोर आली.
भारतीय नौदलाने गंभीर जखमी झालेल्या चिनी नौसैनिकाची सुटका केली
२३ जुलै २०२४ रोजी भारतीय नौदलाने मुंबईपासून २०० नॉटिकल मैल (अंदाजे ३७० किमी) जवळील ‘झोंग शान मेन’ या मोठ्या जहाजातून एका गंभीर जखमी चिनी नौसैनिकाची यशस्वीरित्या सुटका केली होती. मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्र (MRCC) ला ५१ वर्षीय एका खलाशीला गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याची घटना समोर आली असता त्याच्या बचावासाठी नौदलाने भारतीय नौदल हवाई केंद्र INS शिक्रा येथून सी किंग हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. हे ऑपरेशन एमआरसीसी मुंबई आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे केले होते.
अश्या घटनांमध्ये बऱ्याचदा प्रतिकूल परिस्थितीशी सामना करावा लागतो. यावेळी जोरदार वाऱ्याच्या दरम्यान खराब हवामानात ही कारवाई करण्यात आली. ऑपरेशन दरम्यान, ताशी सुमारे 80 किमी वेगाने वारा वाहत होता, ज्यामुळे जहाज समुद्रात हेलकावे घेत होते. याशिवाय जहाजावर डेक नसल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. हे सर्व असूनही जखमी खलाश्याला जहाजातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्याला पुढील वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
भारतीय नौदलाने सोमाली चाच्यांपासून पाकिस्तानी नागरिकांना वाचवले
भारतीय नौदलाने २९ मार्च २०२४ रोजी अरबी समुद्रात १२ तास चाललेल्या धाडसी मोहिमेदरम्यान सोमाली चाच्यांच्या तावडीतून किमान २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात यश मिळाले होते. भारतीय नौदलाला ‘अल कबर’ या इराणी मासेमारी जहाजावर संभाव्य चाचेगिरीच्या घटनेची माहिती मिळाली होती. .
यानंतर, सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी अरबी समुद्रात तैनात असलेल्या दोन भारतीय नौदल जहाजांना अपहरण केलेल्या मासेमारी जहाजाला रोखण्यासाठी वळवण्यात आले..सुटका केल्यानंतर, जहाजावरील इराणी व पाकिस्तानी कर्मचाऱ्यांनी ‘भारत झिंदाबाद’ असे घोषणा देत भारतीय नौदलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच नौदलाने नऊ सशस्त्र चाच्यांना ताब्यात घेतले.
. भारतीय नौदलाचे पहिले यशस्वी पॅरा ड्रॉप ऑपरेशन
भारतीय नौदलाच्या अत्यंत गोपनीय सागरी कमांडोज (MARCOS) यांनी १६ मार्च २०२४ रोजी समुद्रात त्यांचे पहिले पॅरा ड्रॉप ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले होते. भारतीय नौदलाने भारतीय किनाऱ्यापासून जवळपास २,६०० किमी अंतरावर सुमारे ४० तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये माजी माल्टा ध्वजांकित बल्क कॅरियर एमव्ही रुएन ताब्यात घेतले होते, भारतीय नौदलाने भारतीय हवाई दलासोबत समन्वय साधून हे ऑपरेशन पूर्ण केले होते.यावेळी १७ सामान्य नागरिकांची सुटका केली होती आणि ३५ सशस्त्र सोमाली चाच्यांना ताब्यात घेतले होते. या मोहिमेला भारतीय युद्धनौका आयएनएस
सुभद्रा, हाय अल्टिट्यूड लाँग एंड्युरन्स (HALE RPA) ड्रोन, पी८आय सागरी गस्त विमान आणि सी-१७ विमानाने सोडण्यात आलेले मार्कोस यांनी एकत्रित ही कामगिरी पार पाडली होती.
भारतीय नौदलाने अपहरण केलेल्या जहाजातून क्रू मेंबरची सुटका केली
१९ डिसेम्बर २०२३ रोजी अरबी समुद्रात माल्टा देशाचे (Malta) जहाज MV रुएनचे अपहरण करण्यात आले होते. भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण केलेल्या व्यापारी जहाज रुएनमधून एका क्रू मेंबरची सुटका केली होती, जो चाच्यांच्या गोळीबारात जखमी झाला होता.यावेळी नौदलाच्या आघाडीच्या जहाज आयएनएस कोचीने यामध्ये सहभाग घेतला होता.
एमटी न्यू डायमंडवरील आग नियंत्रणात, भारतीय नौदलाकडून बचाव मोहीम
०३ सप्टेंबर २०२० रोजी श्रीलंकेच्या किनाऱ्यावर हे ऑपरेशन पार पडले होते. ‘न्यू डायमंड’ हे एक मोठे क्रूड कॅरियर होते जे सुमारे २७०,००० टन कुवेती क्रूड तेल वाहून नेत होते जेव्हा त्याच्या इंजिन रूममध्ये आग लागली तेव्हाहे जहाज इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या मालकीचे खनिज तेल श्रीलंकेला घेऊन जात होते.समन्वित प्रयत्नांमध्ये अनेक जहाजे आणि विमानांचा समावेश होता, ज्यामुळे माल वाचवण्यात आला आणि तेल गळती रोखण्यात आली. जहाजावरील २२ कर्मचाऱ्यांपैकी एक वगळता सर्वाना वाचवण्यात यश मिळाले आणि ८ सप्टेंबरपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या सतर्कतेने आणि मदतकार्यामुळे हा मोठा अनर्थ टळला होता.