Maruti Chitampalli Passes Away: प्रतिभावंत लेखक, पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक म्हणून ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांचे अर्थातच ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांचे १८ जून रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा पुतण्या श्रीनिवास, भावजय आणि नातवंडे असा परिवार आहे.
मारूती चितमपल्ली यांना २०२५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकाराने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे वितरण दिल्लीत पार पडले. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी एप्रिल महिन्यात ते दिल्लीला गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Droupadi Murmu) यांच्या हस्ते मारुती चितमपल्ली यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु दिल्लीवरून आल्यापासूनच त्यांची प्रकृती ढासळली होती. गेली सात- आठ दिवस त्यांनी अन्न सोडून दिले होते. गेल्या सात-आठ दिवासांत त्यांनी केवळ दूध घेतले होते. अखेर बुधवारी रात्री त्यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांचे अवघे जीवन वनविद्येचा अभ्यास आणि लेखनासाठी समर्पित केले आहे. याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकूयात.
मारूती चितमपल्ली यांचे सुरवातीचे जीवन:
मारुती चितमपल्ली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सोलापूरच्या टी. एम. पोरे विद्यालयातू प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नॉर्थकोर्ट टेक्निकल स्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या काॅलेजमधूव ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा पास झाले. त्यांना इंटरमीजिएट सायन्स पात्रतेनुसार कोईमतूर येथीस सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला आणि १९५८–६० या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
– तसेच मारूती चितमपल्ली यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं.गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन देखील केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे देखील अध्ययन केले होते.
वनविभागातील सेवा:
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव, नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. एकणूच राज्य सरकारच्या वन विभागात 30 वर्ष त्यांनी नोकरी केली. या कार्यकाळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते. तसेच पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासातही महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे.
मारुती चितमपल्ली यांचे वनक्षेत्रातील योगदान आणि साहित्य संपदा:
वनविभागात नोकरी करताना मारूती चितमपल्ली यांनी एक आगळा वेगळा दृष्टीकोन बाळगून वनविभागात काम केले. वनविभागात नोकरी करत असताना त्यांनी अनेक ग्रथांचे वाचन केले. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे अर्थातच वृक्ष-वेली, वन्य पशुपक्षी यांविषयी माहिती घेत सखोल ज्ञान प्राप्त केले. यासाठी त्यांनी भारतभर 5 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून वन्यजीव आणि निसर्गाविषयीच्या नोंदी शेकडो डायऱ्यांमध्ये जतन केल्या. तसेच त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून ओळखल्या. अशाप्राकरे त्यांनी वृक्ष-वेली, वन्य पशुपक्षी यांच्या विषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आणि हे अगाध ज्ञान त्यांनी पुस्तकरूपात मांडले. विशेष म्हणजे त्यांचे जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसेच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी पक्षीतज्ञ सालिम अली, व्यंकटेश माडगूळकर आणि गो.दी. दांडेकर यांच्याकडून त्यांनी ललित लेखनाची प्रेरणा घेतली आणि ललित लेखनाचा मार्ग स्वीकारला.
– चितमपल्ली यांच्या ललित साहित्याची खासियत अशी आहे की, त्यांनी अरण्यविद्येतून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात लिहिली आहे. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. नाना रसभावनांनी त्यांचे लेखन अंतर्बाह्य फुललेले आहे. एकंदरितच त्यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्याच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या असे म्हणता येईल.
-परंतु केवळ ललित लेखनच नाही तर कथा, व्यक्तिचित्रे, आत्मचरित्र, कोशवाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे.
पक्षी जाय दिगंतरा, केशराचा पाऊस, जंगलाचं देणं, नवेगावबांधचे दिवस, मृगपक्षिशास्त्र, रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती , पक्षिकोश, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची काही पुस्तके आहेत. अशा प्रकारे मारूती चितमपल्ली यांनी २० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
त्यांच्या ‘रातवा’ या पुस्तकाला 1993-94 साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला. अशाप्रकारचे अनेक साहित्यिक सन्मान त्यांच्या साहित्याला प्राप्त झाले आहेत.
वनक्षेत्रातील त्यांच्या सर्जनशील आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे त्यांना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी मिळाली आणि ते अरण्यऋषी म्हणून ओळखले जाऊ लागले.
मारूती चितमपल्ली एक ‘पक्षिवेडा माणूस’ :
पक्षिजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. मारूती चितमपल्ली हे पक्षिवेडे होते हे त्यांनी लिहिलेल्या ‘पक्षिकोश’ या ग्रंथातून स्पष्ट होते. ‘कोशवाङ्मयाची निर्मिती’ हे आपले जीवितकार्य आहे, हा ध्यास समोर ठेवून त्यांनी पक्षीकोशाच्या निर्मितीच्या कार्यात स्वत: ला वाहून घेतले होते.पक्षिकोशात त्यांनी 450 पक्ष्यांची माहिती दिली आहे. तसेच पक्ष्यांची अठरा भाषांतील नावे त्यांनी पक्षिकोशात दिली आहेत. ज्या पक्ष्यांची नावे मराठीमध्ये आढळत नाहीत त्यांचे नामकरण करत त्यांनी एकाप्रकारे मराठी भाषेलाही समृद्ध केले आहे. त्यांनी पक्ष्यांचे जीवन आणि त्यांचे सौंदर्य आपल्या साहित्यातून अतिशय देखण्या व चित्रमय स्वरूपात लिहिले. त्यांच्या पक्षांवरील या जिव्हाळ्यामुळे त्यांना ‘पक्षिवेडा माणूस’ म्हणूनही ओळखले जाते.
मारूती चितमपल्ली यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते:
सरकारी नोकरीत वनाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी नोकरीपुरते मर्यादित न राहता वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर स्वत:ला वाहून घेतले होते. यासाठी त्यांनी दर्जेदार साहित्य लेखन केले हे आपण पाहिले. त्यामुळेच २००६मध्ये सोलापूर येथे झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता. संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळतानाही त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती.
मारूती चितमपल्ली यांची त्यांच्या वनलेखनाविषयी प्रतिक्रिया:
२०२० मध्ये जेव्हा मारूती चितमपल्ली नागपूरच्या घरातून सोलापूरच्या निवासस्थानी स्थायिक झाले होते. या निमित्ताने २०२० मध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की,”विदर्भाच्या जंगलात ४५ वर्ष रमलो तेव्हा आदिवासी भाषा शिकण्याचे भाग्य लागले. त्यामुळेच मी मराठी भाषेला एक लाख शब्द देऊ शकलो. हे शब्द मराठीच्या पुस्तकांमध्ये शोधले तर ते सापडणार नाहीत. मात्र विदर्भाच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या तोंडात ते शब्द आहेत. तसेच त्यांच्या लेखन प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले होते की, अगदी लहान वयात मला डायरी लिहिण्याची सवय जडली होती, त्यामुळे मी आज वन साहित्याची रचना करू शकलो आहे. पहाटे तीन वाजता उठून सलग पाच तास लेखन करायचो.”
मारूती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार:
चितमपल्ली यांच्या ललित लेखनाचा, त्यांच्या वनविद्येच्या अभ्यास व संशोधनाचा गौरव म्हणून केंद्र शासनाने त्यांना २०२५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे. तसेच २००८ मध्ये नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार, २०१८ मध्ये १२व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार , २०१२ मध्ये एस.डी. पाटील ट्रस्टचा ‘खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार, कै. शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ‘सहकार महर्षी साहित्य पुरकार, यांसख्या काही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-विशेष म्हणजे २०१७ मध्ये त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले होते
मारूती चितमपल्ली यांच्या निधनानंतरच्या प्रतिक्रिया:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnvis) यांनी मारूती चितमपल्ली यांच्या निधनानंतर एक्सवरती पोस्ट करत म्हटले आहे की,निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
निसर्गाला ज्यांनी शब्दरुपाने सजवले, त्यातून विपूल साहित्यसंपदा निर्माण करुन जनसामान्यांना निसर्गाचे ज्ञान दिले, असे अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारे आहे.
वनविभागात काम करताना आपल्या कामाशी किती एकरुप व्हावे, याचे… pic.twitter.com/PIekZC53iC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी चितमपल्ली यांच्या निधनानंतर म्हटले आहे की, ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनानं निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या रूपाने देशभरातल्या निसर्गप्रेमींनी एक थोर मार्गदर्शक गमावला आहे. झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. पक्ष्यांचं बोलणं, प्राण्यांचं जगणं, झाडांचं संवेदन आणि जंगलाची धडधड याला ग्रंथरूप देणारा एक ऋषितुल्य लेखक आज काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख आहे, असे शरद पवार(Sharad Pawar) यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या रूपाने देशभरातल्या निसर्गप्रेमींनी एक थोर मार्गदर्शक गमावला आहे. झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. पक्ष्यांचं बोलणं, प्राण्यांचं जगणं, झाडांचं संवेदन आणि जंगलाची धडधड याला ग्रंथरूप… pic.twitter.com/nsC1PslnWF
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 18, 2025
तर छगन भुजबळ यांनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अरण्याच्या अभ्यासात आयुष्य घालवलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व, वन्यजीवन अभ्यासक, पक्षिशास्त्रज्ञ आणि प्रतिभावंत लेखक मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
दरम्यान मारूती चितमपल्ली यांचा आयुष्यातील प्रवास निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहील्याचा दिसतो. तसेच त्यांनी मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर घातली. त्यांनी विदर्भाच्या जंगलांना आणि त्यातील वनसंपदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. परंतु आता निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपल्याने देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.