भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोचले आहेत. भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी काल ॲक्सिओम मिशन -4 (Axiom 4) या मोहिमेअंतर्गत फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून उड्डाण करत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास चालू केला होता. दरम्यान नासाच्या फॉल्कन-9 या यानातून प्रवासादरम्यान शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील रोमांचक अनुभव शेअर केला आहे .एक्सिओम स्पेसने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे.यावेळी शुक्ला यांनी देशवासीयांशी संवाद साधला आहे.
“नमस्कार, फ्रॉम स्पेस… माझ्या प्रिय देशवासीयांनों, काय विलक्षण प्रवास आहे. 41 वर्षानंतर पुन्हा अंतराळात हा रोमांचक अनुभव आहे. अंतराळवीराच्या माझ्या पोशाखावर भारताचा तिरंगा ध्वज आहे. तो मला सतत आठवण करुन देत आहे की, मी तमाम भारतीयांपैकी एक आहे. माझ्या देशातील 1.4 अब्ज लोकांचा पाठिंबा माझ्यासोबत आहे. माझ्या माध्यमातून तुम्हीसुद्धा या प्रवासाचा आनंद अनुभवा..
हा एक उत्तम प्रवास आहे. आपण पृथ्वीभोवती ७.५ किमी प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. हा फक्त माझा अंतराळ प्रवास नाहीये. ही भारताच्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेची (Human Space Program ) सुरुवात आहे.त्यांनी अंतराळातून ‘’जय हिंद जय भारत” असा संदेश दिला आहे”.
“अंतराळातून माझा सर्वांना नमस्कार. या प्रवासाचं वर्णन करता येणार नाही. आम्हाला हळूहळू शून्य गुरुत्वाकर्षणाची (झिरो ग्रॅव्हिटी) सवय होत आहे. एखादं बाळ चालायला शिकतं तसंच मी ही शिकतोय. इथे कसं वावरायचं, स्वतःला कसं सांभाळायचं हे शिकतोय. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतोय. हे सगळं खूप गंमतीदार आहे. हा प्रवास खूप रोमांचंक आहे”
Ax-4 Mission | In-Flight Update https://t.co/Lqu0QiGGrA
— Axiom Space (@Axiom_Space) June 26, 2025
भारताच्या अवकाश क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा: शुभांशू शुक्ला यांचा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश
या मोहिमेने भारताच्या अवकाश क्षेत्रात एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. नासाने सुरू केलेल्या अमेरिकन अंतराळ मोहिमेतील अॅक्सिओम ४ चा भाग म्हणून भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी यशस्वीरित्या अवकाशात प्रवेश केला. काल दुपारी १२ वाजता सुरू झालेला हा प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लाँच करण्यात आले. भारताच्या गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून, शुभांशु शुक्ला फाल्कन रॉकेटचे पायलट आहेत. शुभांशू 14 दिवस तिथे रहाणार असून काही प्रयोग तिथे करणार आहेत. जे भारतीय शैक्षणिक संस्थांनी तयार केले आहेत. यापैकी बहुतेक जैविक अभ्यास असतील, जसे की अंतराळातील मानवी आरोग्यावर आणि जीवांवर होणारा परिणाम पाहणे. जसे की , इस्रो-डीबीटी अंतराळ पोषण कार्यक्रमांतर्गत मेथी आणि मूग यासारख्या भारतीय अन्नावर लक्ष केंद्रित करून प्रयोग केला जाईल. दीर्घ कालावधीच्या अंतराळ प्रवास आणि अंतराळवीरांच्या आरोग्यावरील संशोधनही ह्या दरम्यान केले जाणार आहे. याशिवाय, यात ते नासासोबत आणखी 5 प्रयोग करतील, दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा करतील. या मोहिमेत केलेले प्रयोग भारताच्या गगनयान मोहिमेला बळकटी देतील.या मोहिमेच्या माध्यमातून भारत २०२९ मध्ये सुरू होणाऱ्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेच्या गगनयानसाठी तयारी करत आहे.
शुभांशू शुक्ला यांच्याबद्दल थोडेसे..
शुभांशू शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊ येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण लखनौमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये केले. विमानचालनातील रस असल्याने ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत दाखल झाले.
शुभांशूने त्या संस्थेतून बी.टेक पूर्ण केले आणि नंतर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले.
२००६ मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालेल्या शुभांशू यांना विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. त्यांनी हवाई दलात अत्याधुनिक मिग-२१, जग्वार, हॉक, सुखोई आणि डोर्नियर विमाने उडवण्याचे २००० तासांहून अधिक प्रशिक्षण घेतले आहे.
२०१८ मध्ये भारताच्या प्रतिष्ठित गगनयान प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळालेल्या शुभांशू शुक्ला यांनी अंतराळवीर म्हणून प्रशिक्षण घेतले. तसेच शुभांशू यांनी रशियातील युरी गागारिन कॉसमोनॉट प्रशिक्षण केंद्रात आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला होता.
अॅक्सिओम मिशन ४ नक्की काय आहे?
अॅक्सिओम मिशन ४ ही व्यावसायिक मोहीम खाजगी क्षेत्रातील कंपनी अॅक्सिओम, नासा आणि स्पेसएक्स यांच्या संयुक्त उपक्रमातून राबवण्यात येत आहे..अॅक्सिओम मोहिमेचे नेतृत्व नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. या मोहिमेत शुशांशू पायलट म्हणून काम करत आहेत . तर हंगेरी येथील टिबोर कापू आणि पोलंड येथील स्लोवोज उझनान्स्की हे मिशन तज्ञ आहेत. हे उल्लेखनीय आहे की भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी चार दशकांमधील हे दुसरे मानवी अंतराळ मोहीम आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून, शास्त्रज्ञ अनेक प्रकारचा अभ्यास करतील. या यादीत भारत, अमेरिका, युरोप, सौदी अरेबिया आणि ब्राझील हे देश आहेत. हे प्रक्षेपण केवळ भारतासाठी जगासमोर आपली अंतराळ क्षमता दाखविण्याचा एक मार्ग नाही तर गगनयानद्वारे अवकाशात भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याच्या प्रयत्नांमधील पहिले पाऊल आहे. हा प्रयोग आधीच सात वेळा पुढे ढकलण्यात आला होता. अनेक तांत्रिक आव्हानांवर मात केल्यानंतर, यशाच्या दिशेने भारत 1 पाऊल जवळ पोचला आहे. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून भारत-अमेरिका अंतराळ संबंध मजबूत होण्यास मदत होणार आहे.
पीएम मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिक्रिया
शुभांशूच्या अंतराळ मोहिमेवर सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. भारताच्या अंतराळ इतिहासात एक नवीन टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे कौतुक केले. तुमच्या प्रवासाबद्दल संपूर्ण देशाला आनंद आणि अभिमान आहे. तसेच , अॅक्सिओम ४ अंतराळवीरांनी हे सिद्ध केले की सर्व जग एक आहे. त्यांनी नासा आणि इस्रोने हाती घेतलेल्या या मोहिमेला यश मिळावे अशी शुभेच्छा दिल्या.तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंतराळवीरांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, त्यांनी केलेले प्रयोग भारताच्या भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी खूप उपयुक्त ठरतील.
गगनयान मोहिमेची उद्दिष्टे
अॅक्सिओम ४ मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट अंतराळात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे हे आहे. तसेच या अभियाना मार्फत खाजगी अंतराळ प्रवासाला देखील प्रोत्साहन दिले जाईल . आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक (अॅक्सियम स्टेशन) बांधण्याची योजना असलेल्या अॅक्सियम स्पेस प्लॅनिंगचा ही मोहीम एक भाग आहे.
• वैज्ञानिक प्रयोग: सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध प्रयोग करणे.
• तंत्रज्ञान चाचणी: अवकाशात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास.
• आंतरराष्ट्रीय सहकार्य: विविध देशांतील अंतराळवीरांना व्यासपीठ प्रदान करणे.
• शैक्षणिक उपक्रम: अवकाशातून पृथ्वीवरील लोकांना प्रेरणा देणे आणि जागरूकता पसरवणे.