RSS Contribution in Natural Disasters: नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर कोणत्याही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक(RSS) प्रशासनाला सहकार्य करत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्थातच देशावर कोणतेही संकट आले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच देशाच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असतो हे आजवरच्या अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आज महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कसे कार्य केले आहे, याची सविस्तर माहिती आजच्या लेखातून घेऊयात.
सांगली जिल्ह्यातील पूरात संघाचे मदत कार्य:
ऑगस्ट २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सांगली जिल्ह्यात पूरामुळे हाहाकार माजला होता. अतिवृष्टी झाल्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आणि पाणी सांगली जिल्ह्यातील लोकवस्ती असलेल्या अनेक गावात शिरले, त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली. सांगलीतील ही घटना राज्यातील मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जाते. कारण या घटनेत मोठ्या प्रमाणात जिवित हानी झाली होती. तसेच घरांचे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अशा संकटाच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक सांगलीकरांच्या मदतीला पुढे सरसावले होते. त्या वेळी स्वयंसेवकांनी सांगली जिल्ह्यात मदत शिबिराचे आयोजन केले होते. या मदत शिबिराद्वारे पूरग्रस्त लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जात होती. या मदत शिबिराद्वारे पूरग्रस्तांना दररोज जवळपास ५ ते ६ हजार अन्नपुडे बोटीद्वारे व मदत पथकांच्या सहाय्याने विविध गावांतील पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वयंसेवक करत होते.
सांगलीतील मदत शिबिराचे प्रमुख सुनील कुलकर्णी यांनी त्यावेळी मदत शिबिराविषयी ANI शी बोलताना दिलेल्या माहितीप्रमाणे, स्वयंसेवक पूरग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांचा बचाव करीत होते तसेच बचाव पथकांसोबत आवश्यक ती कामे करत होते.
तसेच सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैद्यकीय पथक देखील उपलब्ध करून दिले होते. है वैद्यकीय पथक पूरग्रस्तांना औषधे व आरोग्यविषयक मदत देत होते. राज्यभरातील स्वयंसेवकांच्या मदतीने पूरग्रस्तांना डाळी, गहू, तेल व तांदूळ यांचा समावेश असणारे किराणा साहित्याचे पॅकेट्स पूरविण्यात येत होते. विशेष म्हणजे पूराचे पाणी ओसरल्यावर संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागांची स्वच्छता करण्यात देखील मोठी भूमिका बजावली होती.
२०१५ चा दुष्काळ:
२०१५ मध्ये, पाण्याच्या अभावामुळे महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. यामुळे राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. या परिस्थितीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुष्काळग्रस्त भागांमध्ये मदतीसाठी पुढाकार घेतला होता. संघाने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले होते. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्या उघडल्या होत्या. विशेष म्हणजे संघाकडून दुष्काळग्रस्त भागातील लहान मुलांसाठी अन्नाचीही व्यवस्था केली जात होती.
-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डिसेंबर २०१५ मध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पश्चिम भारत क्षेत्राचे तत्कालीन सेवा प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी यांनी माहती दिली होती की, महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाडा भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी काही उपाययोजना राबवण्याचा पुढाकार घेतला आहे. २०१५ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पाणी संवर्धनाच्या क्षेत्रात काम केले होते. यामध्ये बॅराज बांधणे, नद्यांचे रुंदीकरण करण्यात मदत करणे तसेच खोलीकरण व पुनरुज्जीवन करणे यांसारखी कामे स्वयंसेवकांनी केली होती. तसेच दुष्काळाने अत्यंत ग्रस्त असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही गावांचा अभ्यास करून तेथील दुष्काळ दूर करण्यासाठी योजना आखण्यात आली होती.
-या उपक्रमासाठी लागणारा निधी जनतेच्या सहभागातून आणि उद्योगक्षेत्राकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत मिळवला गेला होता.
कोरोना:
कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले हे संपूर्ण देशाने पाहिले. आपण महाराष्ट्रातील काही घटनांच्या माध्यमातून संघाने कोरोनामध्ये कशाप्रकारे काम केले हे जाणून घेऊयात.
-कोरोनाच्या भयानक परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांत विभागाने कोविड बाधित रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यास मदत केली. तसेच घरगुती उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या गेल्या. या व्यतिरिक्त, संघाने आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी औषधांबाबत मोफत समुपदेशन व मार्गदर्शन सेवा देखील उपलब्ध करून दिल्या होत्या.
-महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रक्तदान शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरांमधून उपचार घेत असलेल्या गरजू रूग्णांसाठी रक्त गोळा करण्यात येत होते. तसेच स्वयंसेवकांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती मोहीम राबवली होती.
-जेव्हा कोरोनाचा नुकताच राज्यात शिरकाव झाला होता तेव्हा पुण्यातील संघांच्या स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी केली होती.
-महाराष्ट्राला जेव्हा कोरोना पेशंटची संख्या वाढली होती तेव्हा रुग्णाला आवश्यक आरोग्यसेवा देण्यासाठी दवाखान्यात बेड मिळत नव्हते. अशावेळी नागपूरमील एक वृद्ध स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी २२ एप्रिल रोजी एका तरुण रुग्णासाठी स्वेच्छेने आपला रुग्णालयाचा बेड सोडला होता. ते ज्या रुग्णालयाला उपचार घेत होते त्या रूग्णालयाला त्यांनी विनंती केली की त्यांना डिस्चार्ज द्यावा, त्यांचा बेड इतरांना द्यावा आणि घरी जाण्याची परवानगी द्यावी.
पुण्यासारख्या शहरांमध्ये संघाकडून ‘आपदा केंद्र’ म्हणजेच आपत्कालीन मदत केंद्रे सक्रिय करण्यात आली होती. या द्वारे गरज असलेल्या वस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून गरजूंना तात्काळ जेवण आणि अन्नधान्य वाटप करण्यात आले होते.
-कोरोनामुळे जेव्हा लाॅकडाऊन पडले होते तेव्हा विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्यासाठी आरएसएसचे स्वयंसेवक पुढे आले होते. स्वयंसेवक जेष्ठ नागरिकांनाते गॅस सिलिंडर, औषधे, भाज्या पुरवण्यास, गरज पडल्यास रुग्णालयात नेण्यास मदत करत होते. जेष्ठ नागरिकांसबोत विधवा, कामगार आणि रेशनकार्ड नसलेल्याअनेक कुटुंबांना स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तू संघाद्वारे पुरवल्या जात होत्या. ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीमधील आदिवासींना वैद्यकीय सेवा मिळविण्यात संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली होती.
– संघाने प्रशासनाच्या सहकार्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर्स आणि विलगीकरण केंद्रे उभारण्यास मदत केली होती.
तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी रुग्णालये आणि गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली.
विशष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना अंतिम संस्कार करण्यासही संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली.
दरम्यान, गरजूंना अन्नधान्य पुरविणे, रक्तदानासारखे उपक्रम राबवणे स्वत: रक्तदान करणे, कोरोनाबद्दल जनजागृती करणे, प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणे अशी कामे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी कोरोना काळात केली.
पानशेत धरण फुटल्याची घटना:
१२ जुलै १९६१ ला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पानशेत धरण फुटले आणि हा पुण्यासाठी काळा दिवस ठरला. कारण धरण फुटल्यामुळे पुराचे पाणी पुणे शहरात आणि आसपासच्या परिसरार शिरले. क्षणातच होत्याचे नव्हते झाले कारण अनेकांचे संसारच्या संसार या पूरात वाहून गेले. बंडगार्डनचा पूल वगळता पुण्यातील इतर सर्वत्र पूल पाण्याखाली गेले होते इतकी भयानक परस्थिती निर्माण झाली होती. या पूरात तब्बल ४ हजार घरे निरूपयोगी झाली. अशा परिस्थीती राष्ट्रीय स्वयंसेवक पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी कपडे, धान्य पुरग्रस्तांना पुरविले.तसेच पूरग्रस्तांच्या पुनर्वसानासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी मदत केली.
-पानशेत धरण फुटल्यामुळे पुराचा तडाखा प्रचंड होता. पुराच्या पाण्याच्या जोरामुळे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरातील नंदी ४० फूट वाहून गेला होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी तो नंदी पुन्हा जागेवर आणून बसविला होता.
नाशिक रामटेक यात्रा:
रामटेक येथे दरवर्षी रामनवमीला मोठी यात्रा भरते. त्यामुळे यात्रेकरूंची येथे प्रचंड गर्दी होत असते. काही दशकांपूर्वी व्यवस्था व अनुशासनाच्या अभावामुळे तेथे चेंगराचेंगरी होत असे, अपघात व्हायचे. त्यामुळे काही भाविक जखमी होत असे. हे लक्षात येताच संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी संघ स्थापनेनंतर स्वयंसेवकांना घेऊन, त्या यात्रेमध्ये आवश्यक त्या व्यवस्था केल्या होत्या. अनुशासन नीट राहील, सर्वजण रांगेतून दर्शन घेतील, चेंगराचेंगरी होणार नाही याची व्यवस्था स्वयंसेवकांनी केली होती. पुढे काही वर्षे हा उपक्रम असाच चालू होता.
लातूर भूकंप:
30 सप्टेंबर 1993ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरून गेली होती. या ठिकाणी झालेल्या भूकंपात हजारो लोक झोपेतच गाडले गेले. या भूकंपात सात हजारांवर लोकांचा बळी गेला होता. जवळपास 16 हजार लोक जखमी झाले होते. त्यामुळे हा भूकंप महाराष्ट्रासाठी महाप्रलय ठरला होता. या दिवशी सगगळीकडे हाहाकाराची विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती. अशा परिस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवक मदतीला सर्वात आधी पोहचले होते. भूकंपाच्या धक्क्याने घरे कोसळून ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्वयंसेवकांनी स्थानिक प्रशासनासोबत तात्काळ बचाव कार्यात भाग घेतला होता.
-जखमींना प्राथमिक उपचार देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली. भूकंपानंतर स्वयंसेवकांनी पूरग्रस्तांसाठी या भागात मदत छावण्या उभारल्या होत्या. बेघर झालेल्या लोकांची अन्न, पिण्याचे पाणी आणि तात्पुरत्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक दिवसरात्र काम करत होते. विशेष म्हणजे भूकंपाच्या धक्क्याने आणि नातेवाईकांना गमावल्यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सुद्धा स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
दरम्यान,आतापर्यंत महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा छोटी मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. तेव्हा तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मृतदेह उचलण्यापासून ते मृतांच्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यापर्यंत महत्वपूर्ण योगदान दिले आहे हे स्पष्ट होते. अर्थातच महाराष्ट्रात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या स्वयंसेवकांनी त्वरित धावून जाऊन मदत कार्य केले आहे. संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली संघाची बांधिलकी यातून अधोरेखीत होते. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत लोकांच्या स्मृतीत खोलवर रूजत आहे.