संघ परिवार म्हटले की आपल्याला सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) आठवण येते. पण या संघटनात्मक कुटुंबात महिलांचाही एक समर्पित आणि मजबूत सहभाग आहे. “राष्ट्र सेविका समिती” ही संघाच्या धर्तीवरच काम करणारी महिलांसाठी स्वतंत्र संघटना आहे. त्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत आपले मोलाचे योगदान दिले आहे. पण या समितीची स्थापना कधी झाली? तीचे कार्य कसे चालते? “राष्ट्र सेविका समिती” च्या या आणि अशा विविध गोष्टींची माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
राष्ट्र सेविका समिती स्थापना आणि उद्दिष्टे
१.स्थापना
राष्ट्र सेविका समिती ही एक महिलांसाठीची संघटना आहे, जी २५ ऑक्टोबर १९३६ रोजी वर्धा येथे सुरू झाली. ही संस्था लक्ष्मीबाई केळकर मावशी यांनी सुरू केली. मावशींनी डॉ. हेडगेवार (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक) यांना भेटून महिलांसाठी स्वतंत्र संस्था सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यांनी ही कल्पना मान्य केली. त्यांचे पाठबळ मिळाल्यानंतर विजयादशमीच्या शुभ दिवशी समिती अस्तित्वात आली. या संस्थेचे नाव आणि कामाची रचना आरएसएससारखी असली तरी, ही संस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे. तिचे मुख्य काम महिलांमध्ये जागरूकता, देशभक्ती आणि नेतृत्व विकसित करणे हे आहे. समितीचे मुख्यालय नागपूर येथे आहे. स्त्री ही राष्ट्राची आधारशिला आहे हे सूत्र डोळ्यांसमोर ठेवून स्त्रीशक्तीला जागृत करणे आणि राष्ट्रनिर्मितीत तिचे योगदान वाढवणे हे राष्ट्र सेविका समितीचे मुख्य ध्येय आहे.
२.उद्दिष्टे (मुख्य काम)
महिलांचा सर्वांगीण विकास
राष्ट्र सेविका समितीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भारतीय स्त्रीमध्ये शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास घडवून तिच्यात देशभक्ती, स्वावलंबन आणि नेतृत्वगुण निर्माण करणे. यासाठी संपूर्ण देशभर “शाखा” चालवल्या जातात. या शाखांमध्ये महिलांना योगाभ्यास, व्यायाम, गीत, कथाकथन, वक्तृत्व यासारख्या गोष्टी शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो
स्वसंरक्षण, सेवा आणि नेतृत्वासाठी प्रशिक्षण
समिती आत्मसंरक्षणावरही भर देते. त्यामुळे महिलांना स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवल्या जातात. देशासाठी योगदान द्यावे. ही भावना त्यांच्या मनात रुजवली जाते. याचबरोबर सेवा कार्य आणि नेतृत्वाची तयारी करणे हा देखील या मागचा उद्देश आहे.
समाजजागृतीसाठी उपक्रम
संस्कार वर्ग, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, पर्यावरण रक्षण यांसारखे उपक्रम घेऊन समिती समाजात जागृती निर्माण करते. अशा प्रकारे समितीचे कार्य स्त्रीशक्तीला उभारी देऊन राष्ट्रनिर्मितीत महत्वाची भूमिका बजावत आहे.
२.स्त्रीशक्तीचा राष्ट्रनिर्मितीत सहभाग
आज अनेक महिला स्वयंसेविका समाजासाठी निःस्वार्थपणे काम करत आहेत. त्या समाजातील गरीब, गरजू, अनाथ किंवा मागासवर्गीय लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, संस्कार यासारखी सेवा देणारी केंद्रे चालवतात. उदाहरणार्थ काही महिला स्वयंसेविका लहान मुलांना शिक्षण देतात. तर अनेक ठिकाणी गरीब महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू आहेत. समिती वृद्ध, अपंग किंवा समाजातील गरजूंना नेहमीच मदतीचा हात देत आली आहे. अशा सेवा केंद्रांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिक्षण ते स्वावलंबन
राष्ट्र सेविका समिती संपूर्ण भारतातील अनेक अनाथ मुलींची जबाबदारी घेते आणि यासाठी समितीकडे संपूर्ण भारतात २२ वसतिगृहे आहेत, जिथे मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी घेतली जाते. येथे त्यांना शिकवून त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केली जाते.
संस्कार व नेतृत्व विकास:
समितीमार्फत मुलींमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मभान विकसित करण्यासाठी विविध वर्ग, शिबिरे व प्रशिक्षण घेतले जातात. यामध्ये लहान मुले, मुली आणि गृहिणींसाठी वनविहार आणि शिबिरे आयोजित करणे, अखिल भारतीय आणि प्रांत, विभाग पातळीवर परिषद आयोजित करणे. तसेच आरोग्य शिबिर, बालमंदिर संस्कार वर्ग यासह विविध सेवा आपुलकीच्या भावनेने पार पाडल्या जातात. महिला जागृत झाल्या तर कुटुंब आणि समाज सुसंस्कृत होतो, या भावनेने समिती कार्य करत आहे.
३.विविध क्षेत्रांतील योगदान
शिक्षण क्षेत्रातील योगदान
शिशु ज्ञान मंदिर, जबलपूर – इथे पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. सरस्वती सिंधू न्यास, जालंधर येथे लडाख भागातील गरजू मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. नक्षलवादी हिंसाचार आणि दहशतवादामुळे प्रभावित झालेल्या मुलींसाठी शहरांमध्ये अनेक वसतिगृहे स्थापन करण्यात आली आहेत. येथे त्यांना शिक्षण, निवास आणि पोषणासाठी मोफत सुविधा दिल्या जातात. अनेक मुलींनी या सुविधांचा वापर केला आहे आणि आत्मनिर्भरतेसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे.
स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास
श्री शक्ती प्रतिष्ठान, गुजरात येथे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवणकामाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच गर्भवती महिलांना गर्भसंस्काराचे प्रशिक्षण दिले जाते. समर्थ सेवा न्यास, जयपूर हे आणखी एक कौशल्य विकास केंद्र आहे जे शिवणकाम, वैद्यकीय सेवा आणि सांस्कृतिक गोष्टी शिकवते. या केंद्रात सर्पमित्रांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि मध्यान्ह भोजन देखील देण्यात येते.
नर्सिंग आणि आरोग्य सेवा
मुलींना आरोग्यसेवेत काम करता यावे व त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी माहीम आणि कल्याण केंद्रांमध्ये, आदिवासी मुलींना मोफत नर्सिंग प्रशिक्षण दिले जाते. अनेक आदिवासी मुलींना येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यांना रुग्णालयात नोकऱ्या देखील मिळाल्या आहेत किंवा त्यांनी त्यांच्या कौशल्यांचा वापर करून त्यांच्या गावांना मोफत आरोग्य सेवा देण्यात मदत केली आहे. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील अनाथ मुलींना मोफत जेवण आणि शिक्षणासह वसतिगृह सुविधा देखील दिल्या जातात. याशिवाय देवी अहिल्याबाई स्मारक समिती, नागपूर येथे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह, लहान मुलांसाठी प्री-नर्सरी आणि आयुर्वेदिक औषधांची सुविधा दिली जाते.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत
जेव्हा पूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्ती येतात, तेव्हा सेविका गरजूंना मदत करतात. त्या लोकांना अन्न वाटतात, औषधे आणि वैद्यकीय मदत पुरवतात. तसेच, पिडीतांचे किंवा दुःखी लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना मानसिक आधारही देतात. लातूर आणि गुजरातमधील भूकंप, ओडिशातील वादळ आणि उत्तराखंडमधील अचानक आलेल्या पुरात समितीने मदत केली होती. यादरम्यान तसेच आपत्तीग्रस्तांसाठी दिवसरात्र काम करत मदत शिबिरे उभारली होती.
४.आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार
राष्ट्रसेविका समितीचे कार्य भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. भारतात समितीच्या जवळपास ५००० शाखा आहेत आणि परदेशातही तिच्या धर्तीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत.
परदेशातील शाखा:
अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा एकुण १० पेक्षा जास्त देशांमध्ये राष्ट्रसेविका समितीसारखीच काम करणारी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या शाखांमधून तेथील भारतीय महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.परदेशात वाढणाऱ्या भारतीय पिढीमध्ये भारतीय ओळख टिकवून ठेवण्याचे हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
भारतीय मूल्यांचा प्रचार:
परदेशात राहणाऱ्या भारतीय महिलांमध्ये आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. सण-उत्सव, योग, भारतीय परंपरा आणि संस्कृती यांची माहिती दिली जाते आणि त्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जातो.यामध्ये प्रामुख्याने इतिहासातील थोर महिलांचे उदाहरण दिले जाते. जसे की माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, देवी अहिल्याबाई होळकर या महिलांनी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जे कार्य केले, त्यातून प्रेरणा घेऊन आजच्या महिलांनीही समाजसेवा आणि सांस्कृतिक जपणूक करावी, असा संदेश दिला जातो. त्यांच्या कार्याचे दर्शन घडवून त्यांचा आदर्श समोर ठेवला जातो.
५.समितीतून घडलेल्या काही उल्लेखनीय कार्यकर्त्या
१.लक्ष्मीबाई केळकर मावशी (संस्थापिका, १९३६–१९७८):
मावशींनी महिला संघटन, स्त्रीशक्ती जागृती, हिंदुत्व प्रचार यामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांना केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रनिर्मितीत भाग घेण्याची प्रेरणा देण्यात आली. त्यांनी महिलांना व्यायाम, वक्तृत्व, शिस्त, सेवा, शिक्षण आणि नेतृत्व यात प्रशिक्षित केले. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील कराचीमध्ये हिंदूं समुदायावर अत्याचार सुरू होते. मात्र अशा कठीण परिस्थितीतही केळकर मावशी जीवाची पर्वा न करता तिथे गेल्या, सेविकांना धीर दिला आणि हिंदू कुटुंबांना सुरक्षित भारतात आणण्यासाठी मदत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्र सेविका समितीच्या महिलांनी देशाच्या स्वातंत्र्य, युद्ध आणि आपत्ती काळात सक्रिय भूमिका बजावली. स्त्रीच्या शक्तीचा उपयोग त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी केला.
२.सरस्वती ताई आपटे (१९७८–१९९४)
सरस्वती आपटे या राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय संचालिका होत्या. वास्तविक सरस्वती ताई लहानपणापासूनच समाजसेवेमध्ये सक्रिय होत्या. गोवा मुक्ती संग्राम आणि पानशेत धरण दुर्घटनेत त्यांनी मोठे योगदान दिले होते. १९६२ चीन–भारत युद्धाच्या काळात त्यांच्या नेतृत्वात समितीने घरोघरी जाऊन आर्थिक मदत गोळा करुन संरक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द केली होती. तसेच १९६५ भारत–पाक युद्धात, रेल्वे स्थानकांवर जवानांसाठी अल्पाहार आणि भोजनही उपलब्ध करून दिले होते.
३.उषाताई चाटी तृतीय प्रमुख संचालिका (१९९४–२००६)
उषाताईंनी आपल्या कार्यकाळात देशभर शाखा व सेवा प्रकल्प वाढवले आणि महिला कार्यकर्त्यांना प्रभावी प्रशिक्षण दिले.त्या अखिल भारतीय गीत प्रमुख होत्या. गीत, संस्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांनी अनेक महिलांना प्रेरीत केले. शिक्षिका म्हणून सेवा करत असताना मुलींना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना वक्तृत्वाचे धडे दिले. तसेच शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही दिले. त्यांनी वाग्मिता विकास समितीसारख्या संस्था स्थापन करून समाजकार्य चालू ठेवले. आपत्कालीन काळातही त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या अत्यंत खंबीरपणे सांभाळल्या.
४.प्रमिला ताई मेढे (२००६–२०१२)
प्रमिला ताईंनी ३० वर्षे प्रमुख कार्यवाहिका आणि ६ वर्षे प्रमुख संचालिका म्हणून कार्य केले. त्यांच्या नेतृत्वात समितीचे मोठे विस्तारीकरण झाले. देशभर शाखा व प्रकल्प वाढण्यास मदत झाली. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आदी देशांत जाऊन समितीचे कार्य सुरू केले. तसेच न्यू जर्सी (अमेरिका) येथून त्यांना मानद नागरिकत्व मिळाले आहे. मावशींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी भारतभर चित्रप्रदर्शन घेऊन १०० पेक्षा जास्त ठिकाणी प्रवास केला. त्या उत्तम वक्त्या, चिंतनशील विचारवंत आणि कुशल लेखिका असून, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. स्त्रीशक्ती, संस्कार आणि आत्मसंयमावर त्यांनी नेहमी भर दिला. ७० वर्षांहून अधिक काळ त्या राष्ट्र सेविका समितीच्या सेवेत कार्यरत राहिल्या.
५.शांताक्का व्ही. शांता कुमारी (2012–आतापर्यंत)
शांताक्का या गणित आणि शिक्षणशास्त्र या विषयांत पदवीधर आहेत. त्या बेंगळुरूमधील भारतीय विद्या भवनमध्ये काही वर्षं शिक्षिका म्हणून काम करत होत्या. 1995 साली त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ समितीच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. सध्या त्या नागपूर येथे राहतात. समितीचे काम वाढवण्यासाठी त्या वेळोवेळी अमेरिका, इंग्लंड अशा देशांतही प्रवास करतात.त्यांची निष्ठा, कार्यशीलता आणि समर्पण भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
एकूणच राष्ट्र सेविका समिती ही महिलांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानामध्ये मोलाची भूमिका बजावत आहे १९३६ पासून सुरू झालेल्या या संस्थेने महिलांना आत्मनिर्भर, सशक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक बनवण्याचे कार्य केले आहे. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, नैसर्गिक आपत्तीतील मदत अशा विविध क्षेत्रांत योगदान देत समितीने समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत. परदेशातही आपल्या संस्कृतीचा प्रसार करून, जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण साधले आहे.