महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या संतांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळे समाज एकात्मतेच्या धाग्याने बांधला गेला. पंढरपूरची वारी ही या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. परंतु सध्या काही विघातक प्रवृत्तींकडून पंढरपूरच्या वारीमध्ये जातीपातीचे आणि इतर षडयंत्राचे प्रयोग करून हजारो वर्षांच्या वारी परंपरेला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.
१.नेमके प्रकरण काय?
वारीमध्ये कोणताही धार्मिक प्रचार किंवा हस्तक्षेप होऊ नये, हीच वारकरी संप्रदायाची आणि जनतेची अपेक्षा असते. मात्र यंदा संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावरील फातिमानगर येथे घडलेल्या एका प्रकारामुळे वारीच्या पवित्रतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
१.फातिमानगर येथे ख्रिस्ती प्रचारकांचा शिरकाव
आषाढी वारीच्या मार्गातील फातिमानगर येथे काही ख्रिस्ती महिला प्रचारकांनी वारकऱ्यांच्या दिंड्यांमध्ये घुसखोरी केली. त्यांनी वारकऱ्यांना बायबलमधील संदेश असलेली पत्रके वाटली ज्यामध्ये “येशू ख्रिस्त हाच खरा देव आहे” असा प्रचार केला गेला. हे पत्रके व्यसनमुक्तीच्या नावाखाली वाटले जात होते. शिवाय व्यसनमुक्ती करण्यास संपर्क करण्याचे आवाहन करून त्यावर मोबाईल क्रमांकही देण्यात आले होते. परंतु त्यामध्ये स्पष्टपणे धार्मिक प्रचार व धर्मांतराचे संकेत होते.
२.धर्मांतरणाचा प्रयत्न
मूळात व्यसनमुक्तीच्या पत्रकांवर येशू ख्रिस्ताची उपार करण्याचे आवाहन करणाऱ्या लिखाणाची आवश्यकता काय? विठ्ठलाची भक्त करणाऱ्या आणि हिंदु धर्मशास्त्रानुसार उपासना करणाऱ्या वारकऱ्यांना बायबलमधील लिखाण असलेल्या पत्रकांचे वितरण कशासाठी? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंदू संघटनांचे आणि अनेक वारकऱ्यांचे म्हणणे आहे की, ही केवळ व्यसनमुक्ती नव्हे, तर धर्मांतराचा सुनियोजित प्रयत्न आहे. व्यसनमुक्तीच्या आडून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात केला जात आहे.
२. वारकरी चळवळीचा पवित्र हेतू भंग होतोय का?
१.वारीची शुद्धता धोक्यात
वारकरी संप्रदाय हा भक्ती, एकात्मता आणि समतेचा संदेश देणारा आहे. परंतु बाह्य प्रचारामुळे या अध्यात्मिक यात्रेची शुद्धता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही अराजकतावादी प्रवृत्तींनी वारीमध्ये मटणाचे तुकडे फेकण्याचा विघातक प्रकारही केला होता. वारकऱ्यांच्या श्रद्धेवर झालेला हा आघात अजूनही ताजा आहे. त्यात भर म्हणून आता धर्मांतराच्या प्रचाराचे प्रकार वारीच्या मार्गावर दिसू लागले आहेत. वास्तविक वारी ही फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचा मोठा उत्सव मानला जातो. अशा ठिकाणी धर्मांतराचा प्रचार केल्यास ते सामाजिक तणावाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे या प्रकराचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
२.संतांच्या अभंगांची मोडतोड
वारीमध्ये संतांच्या अभंगांची मोडतोड करुन किंवा अर्धवट संदर्भ देऊन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही दिसून आले आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा अर्धवट व खोडसाळ अर्थ लावून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली गेली. “अल्ला देवे…” या अभंगाच्या चुकीच्या मांडणीमुळे तुकोबाराय मुस्लिमधार्जिणे असल्याचा अपप्रचार केला गेला, यातुन वारकरी संप्रदायात संभ्रम व दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
वास्तविक संत तुकोबांनी आपल्या जवळपास ४००० अभंग असलेल्या गाथेच्या माध्यमामधुन समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भाष्य केलेल आहे. वेदशास्त्र, ज्ञान अध्यात्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध पैलूचे महत्व विशद केले आहे. केवळ”अल्ला देवे-अल्ला करे सो होय” एवढंच सांगितले नाही. परंतू ज्या प्रमाणे गेल्या दोन तिन शतका पासून महाराष्ट्रात चुकीचा खोटा इतिहास मांडून शिवरायांची धर्मनिरपेक्ष व मुस्लिमधार्जिणे अशी प्रतिमा उभी करण्यासाठी चढाओढ लागली आहे, अगदी तसेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा अर्धवट उल्लेख करून त्यांच्या संपूर्ण विचारसरणीचा विपर्यास केला जात आहे. तुकाराम महाराज मुस्लिम धार्जिणे, मुस्लिम सुफी संत परंपरा मानणारे किंवा अल्लाची भक्ती करणारे होते, असा चेष्टा करणारा गैरसमज निर्माण करणारा प्रयोग झालेला आहे. वारकरी संप्रदायमध्ये असे संभ्रम निर्माण करणारे प्रयोग करून वारकरी जातीपंथात कसा विभागला जाईल, दुफळी कशी निर्माण केली जाईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
३.लोकायतसारख्या संघटनांचे स्वरूप
या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटलेले पाहायला मिळाले. काही आमदारांनी या संघटनांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यात लोकायतसारख्या संघटनांचे स्वरूप आणि त्यांचा उद्देश काय, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
१.विधानसभेत संतापाचा सूर
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केलेल्या विधानानुसार, पंढरपूरची वारी अशी आहे जिथे कोणी कोणाला निमंत्रण देत नाही. पण वेगवेगळ्या बोगस नावाखाली आणि अर्बन नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या काही संघटना संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत सारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये ठिकठिकाणी जाऊन पथनाट्य करतात, भाषणे देतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. देवाला धर्माला ही लोकं मानत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. पण या संघटना हिंदू धर्म आणि वारीबद्दल अपप्रचार करत असल्याचे आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
पंढरपूरच्या वारीत शिरकाव केलेल्या अर्बन नक्षलींवर कारवाई करण्यात यावी.
डॉ. मनीषा कायंदे
आमदार, शिवसेना#Shivsena #Eknathshinde pic.twitter.com/lFmUkj37sV— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) July 2, 2025
२.संघटनांच्या कार्यपद्धतीबाबत संशय
मनिषा कायंदे म्हणाल्या की यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. मी काही वारकरी संघटनांना भेटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यावर बंदोबस्त करू, असे आश्वासन दिले आहे. काही लोक पकडले गेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. हा हिंदू धर्माला आणि वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील मनिषा कायंदे यांनी केला आहे. वारीचा गैरफायदा घेऊ नये हाच उद्देश आहे. संविधानाच्या नावाखाली फेक नरेटिव्ह पसरवणारे हे लोक नाहीत ना? असाही सवालही मनिषा कायंदेंनी उपस्थित केला आहे.
या संघटनांचे काम काही प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणविषयक जागरूकता आणि सामाजिक समता यासाठी असलेले दाखवले जात असले तरीही त्यामागे धार्मिक किंवा राजकीय अजेंडा असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी असेल असे सांगण्यात येत आहे.
४. राजकीय पक्षांची भूमिका आणि प्रतिक्रिया
दरवर्षी लाखो वारकरी वारीमध्ये श्रद्धेने सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांच्याही भूमिका महत्त्वाच्या ठरतात.
१ सरकारचे आश्वासन
भाजप व शिवसेना शिंदे गटासारख्या पक्षांनी या प्रकारांवर तीव्र निषेध व्यक्त केला असून, “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक” सादर करून अशा घटनांवर प्रतिबंध घालण्याचा मानस व्यक्त केला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विधानसभेत बोलत असताना अशा प्रकारांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पंढरपूरमध्ये सध्या वारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क असून वारी निर्विघ्न पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
२.विरोधक आणि प्रश्नचिन्हं
दूसरीकडे विरोधी पक्षांनी अशा गंभीर प्रकरणाचा निषेध करायचा सोडून सरकारच्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या उद्देशांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मनिषा कायंदे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. सरकारवर टीका करणे हे लोकशाहीचे लक्षण असले तरी, गंभीर मुद्द्यांवर राजकारण करण्याऐवजी सकारात्मक चर्चा करणे अपेक्षित आहे. पण ते न करता अशा गंभीर प्रकरणात सरकारच्या धोरणावर टीका केल्याने उबाठा गट अशा वारीतील घटनांना अप्रत्यक्षपणे समर्थन तर देत नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
५.वारकरी संप्रदायाची भूमिका काय?
वास्तविक वारकऱ्यांसाठी वारी ही भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा उत्सव असतो. त्यामुळे वारीच्या पवित्रतेला बाधा येणाऱ्या कोणत्याही कृतीला वारकरी संप्रदायाकडून तीव्र विरोध होतो. सध्याच्या घडामोडींवर देखील वारकऱ्यांनी आपली ठाम भूमिका मांडलेली आहे.
१.वारकऱ्यांचा विरोध
वारकरी संप्रदायातील अनेक प्रमुख मंडळींनी या प्रकारांवर नाराजी व्यक्त केली असून, वारीच्या अध्यात्मिक स्वरूपात अशा अतिक्रमणास ठाम विरोध दर्शविला आहे. वारीत घुसून वारकऱ्यांचे धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती प्रचारकांच्या विरोधात हिंदु राष्ट्र समन्वय समितीद्वारे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिंतामणि प्रासादिक दिंडीचे सचिव ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे यांनी २२ जून या दिवशी वानवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या तक्रारीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, पंढरपूर वारीसारख्या हिंदूंच्या पवित्र सोहळ्याच्या काळात धर्मांतरप्रवण कृत्य करणे म्हणजे हिंदू समाजाच्या श्रद्धेवर घाला घालण्यासारखे आहे. कायद्याच्या दृष्टीने हा एक गंभीर गुन्हा असून, भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२३ अंतर्गत अशा प्रकारांवर कारवाई करणे आवश्यक आहे. विशेषतः भारतीय दंड संहितेच्या कलम 295 अ (धार्मिक भावना दुखावणे), कलम 153 अ (धार्मिक द्वेष पसरवणे), कलम 298 (अपमानजनक उद्देशाने धर्मसंबंधी वक्तव्य), कलम 505(2) (धार्मिक समुदायांत शत्रुता निर्माण करणे), तसेच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2023 अंतर्गत (फसवणूक व दबावाद्वारे धर्मांतराचा प्रयत्न) अशा कायद्यांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
संयुक्त मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.
संबंधित पत्रकांवरील मोबाईल नंबरचा मागोवा घेऊन त्यांच्या नेटवर्कचा शोध घेतला जावा.
पालखी मार्गावर धर्मांतरासंदर्भातील कोणताही प्रचार थांबवण्यासाठी बंदी घालण्यात यावी.
यासंदर्भात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा.
ही भूमिका केवळ धार्मिक श्रद्धेच्या रक्षणासाठीच नव्हे, तर सामाजिक सौहार्द आणि कायदा-सुव्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.
२. बंडातात्या कराड यांची भूमिका
बंडातात्या कराड हे वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व आहेत.त्यांनी पंढरपूर वारीतील धर्मांतर व अर्बन नक्षलवाद्यांच्या सहभागावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी वारीमध्ये मांस फेकण्याच्या घटनेसह, धर्मांतराच्या प्रयत्नांवरही गंभीर भाष्य केलं असून, हे प्रकार वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात करणारे असल्याचं ठामपणे म्हटले आहे.
बंडातात्या केवळ वक्तव्य करून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भात एक सविस्तर निवेदनही सादर केले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत असून या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी. हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजे. लोकांना देवापासून दूर नेणे किंवा हा हिंदू धर्मावर आक्रमण करण्याचा प्रकार असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही भूमिका वारीच्या रक्षणासाठी असून, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धा आणि परंपरा जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
एकूणच वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. मात्र सध्या काही विघातक प्रवृत्ती तिच्या पवित्रतेवर गदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत.धर्मांतराचा प्रचार, अभंगांची मोडतोड, अराजकतेचे प्रयोग आणि राजकीय अजेंडा राबवणाऱ्या संघटनांचे अतिक्रमण हे त्याचे उदाहरण आहेत. वारकरी संप्रदाय, काही राजकीय नेते आणि हिंदू संघटनांनी यावर तीव्र निषेध केला असला तरी अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर प्रत्येक भाविकाने जागरूक राहून, कोणत्याही प्रकारच्या अफवा, गोंधळ किंवा धर्मप्रचाराला थारा न देता, भक्तीची वाट शुद्ध ठेवणं हिच खरी विठोबाची सेवा आणि संतांच्या शिकवणुकीचा खरा आदर ठरेल.