सातारा दि 18 – समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा प्रकार सातारा शहर परिसरात घडला. हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना तसेच शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जय श्रीरामाच्या घोषणा देत कार्यालय परिसर दणाणून सोडला. हजारो युवकांनी गुरुवारी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत सकाळी साडेदहाच्या सुमारास शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी तत्काळ थांबवावी आणि आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच काही नागरिकांनी प्रशासनास निवेदन दिले.
छ. शिवरायांबद्दल समाज माध्यमातून केली जाणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यानच्या काळात शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले आणि त्यांनी सातारा पंढरपूर महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच रस्त्यावर बसून राहत रास्ता रोको आंदोलन केले, संबंधितांवर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली.
Tags: NULL