उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आदी उपस्थित होते.
उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, आणि 25 लाख रुपयांचा धनादेश आणि आजच्या या खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले.
टाटा ग्रुप हा देशभरात तसेच जगभरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे सर्वसामान्यांना परडवडणाऱ्या कारपासून एअरलाइन्स पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये टाटा हे नाव अभिमानाने घेतले जाते टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट अशी भावना सर्वांची आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार उद्या रविवारी दि २० ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता होणार आहे.