जपान सरकारच्या विशेष आमंत्रणावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५ दिवसांसाठी जपान दौऱ्यावर गेले आहेत. आज जपानमध्ये दाखल होताच टोक्यो विमानतळावर जपानमधील मराठी लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने या दौऱ्यात प्रयत्न होणार आहे. त्याचबरोबर उद्योग, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील काही प्रकल्प, सामंजस्य करार आणि सहकार्य यासाठी हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.जायका,जेट्रो,जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्यांचीही ते या दौऱ्यावेळी भेट घेणार आहेत.जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे.तसेच राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत.जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौऱ्यात फडणवीस भेटी देणार आहेत. २० ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौऱ्यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत.वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देतील असे सांगण्यात आले आहे.