भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम आता अंतिम टप्प्यावर येऊन पोचली आहे.चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे विक्रम लँडर हळूहळू वेग आणि अंतर कमी करत चंद्राच्या आणखी जवळ जात आहे. चांद्रयान-3 ने ठरल्याप्रमाणे आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यामुळे यापुढील टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करेल, अशी आम्हाला खात्री आहे असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने सांगितले आहे
चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागावर चांद्रयान-3 चं विक्रम लँडर उतरणार आहे.चांद्रयान-3 च्या चंद्र मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाच्या रिअल-टाइम अपडेटसाठी इस्रोने खास तयारी केली आहे. ज्यामुळे घरबसल्या तुम्हाला चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरण्याचा प्रवास पाहता येणार आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याचे थेट प्रसारण केले जाणार आहे.
चांद्रयान या लँडिंग दरम्यान दोन रेकॉर्ड बनवणार आहे. प्रथम, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, भारत हा पराक्रम करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश बनेल. लँडिंग झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रावर अशोकस्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह तयार करणार आहे. सहा चाकी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून रॅम्पमधून बाहेर येईल आणि इस्रोकडून आदेश मिळताच चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल.या दरम्यान,भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगो चाकांच्या माध्यमातून चंद्राच्या मातीवर आपली छाप सोडणार आहे.
चांद्रयानाने चंद्राची छायाचित्रे घेतली असून प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल.लँडर-रोव्हर पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेण्यासह इतर प्रयोग करणार आहे.