भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि मोठ्या गौरवाची घटना आज घडली आहे. भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने उंचावली गेली आहे. चांद्रयान-3 मधील लँडर मॉड्यूल हे यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे.चंद्रावर लँड होणारा भारत चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करत चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. चांद्रयान ३ ने इतिहास रचला असून भारताच्या या अव्वल कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगाने कौतुक केले आहे.
23 ऑगस्ट 2023 ही तारीख इतिहासाच्या पानात कायमची नोंद झाली आहे.
भारताची ही चंद्र मोहीम यशस्वी होण्यामागे इस्रोच्या शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची मेहनत आहे. चांद्रयान-3 च्या यशावरून हे दिसून येते की हा नवा भारत कोणत्याही क्षेत्रात मागे राहू इच्छित नाही. त्यामुळेच चांद्रयान-३ च्या लँडिंगपूर्वी देशातील विविध राज्यांतील लोक या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना करत होते. शाळकरी मुलांपासून कलाकारांपर्यंत सर्वांमध्ये या मिशनबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला.
https://twitter.com/narendramodi/status/1694327342070431785
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी सगळ्यांची धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगत त्यांनी हा क्षण भारतासाठी नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचे सांगितले आहे.