चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडींग केले आहे. असे करणारा हा भारत देश पहिला ठरल्याने या यशाने देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर चांद्रयान -3 चा पुढील प्रवास सुरु झाला आहे. प्रज्ञान रोव्हरला विक्रम लॅंडरमधून बाहेर काढण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली असून प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामाला सुरवात केली आहे.
चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षामध्ये फिरतोय. त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश आहे. विक्रम हा लँडर आहे, जो चंद्रावर लँड केला आहे आता त्यातून रोव्हर वेगळा झाला. आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरेल अन् तेथील डेटा इस्रोला पाठवेल. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरने आपले काम सुरु आहे.
आता प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर चालत आहे. हे ६ चाकी रोबोटिक वाहन प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील माहिती पाठवणार आहे.हे पुढील १४ दिवस चंद्रावर संशोधन करणार आहे. त्याने पहिले छायाचित्र इस्रोच्या कमांड सेंटरला पाठवले आहे. चांद्रयान ३ चे हे ज्ञान रोव्हर चंद्रावरील पाणी, माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करेल . चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एकत्र केलेली ही सर्व माहिती रोव्हर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या घटकांची उपस्थिती शोधण्यात येणार आहे . रोव्हरच्या या कामगिरीमुळे अनेक प्रकाराच्या संशोधनाला तर चालना मिळेलच पण भविष्यात स्पेस सायन्समध्ये भारताचे मोठे योगदान असणार आहे.