चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोकडून पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मिशन आदित्य एल-१ हे २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजून आकाशात झेपावणार आहे.श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल १ हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. या मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहे.सूर्य आणि भोवतीच्या वातावरणाचा या मोहिमेत अभ्यास करण्यात येणार असून त्यातुन सुर्याविषयीची असणाऱ्या अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो, असा विश्वास शास्त्रज्ञानी व्यक्त केला आहे.
सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम असणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘लॅगरेंज पॉइंट १’पर्यंत हे यान नेण्यात येणार आहे.या ठिकाणाहून कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचे निरीक्षण करता येणार आहे. तसेच सूर्यावरील घडामोडी काही सेकंदांमध्ये पाहता येण्यासाठी या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. या यानावर एकूण सात उपकरणे असून, त्याद्वारे विविध निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत.
इस्रोची आदित्य एल १ मोहिम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटले आहे की, ‘भारताची आता सूर्यावर जाण्याची तयारी सुरु आहे.’ ही मोहीम यशस्वी ठरल्यास सूर्याच्या अभ्यासासाठी उपग्रह पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि यूरोपीय अंतराळ संस्था यांनी अशा मोहिमा केल्या आहेत.