नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्य हे अधिक विस्तारित व व्यापक आहे. उभय देशांत अणुऊर्जेतील सहकार्य अत्यंत यशस्वी ठरले आहे. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासंदर्भात भारताला सहकार्य करणारा रशिया हा एकमेव देश आहोत. असे प्रतिपादन रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी नवी दिल्ली येथे बोलत असताना त्यांनी भारत-रशिया संबंधांवर भाष्य केले. दोन्ही देशांचा आर्थिक विकास समाधानकारक आहे आणि दोन्ही देश अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करत आहेत असे अलीपोव्ह यावेळी म्हणाले.
एस-४०० ही विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली भारताला सोपवण्याची प्रक्रिया सुरू असून नियोजित वेळेत ती भारताकडे सुपूर्द केली जाईल असे अलीपोव्ह यावेळी म्हणाले. या करारामधील रशियन कंपन्यांचे प्रमुख निश्चित झाले असून भारतीय भागीदारांसह ठरलेल्या वेळापत्रकानुसार पुढील वर्षाच्या अखेरीस ती यंत्रणा भारताकडे सोपवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही तर नागरी क्षेत्रातही उत्पादन आणि रेल्वे विकास यामध्ये भारताशी सहकार्य करण्याचा रशियाचा मनोदय आहे. भारताचाही यादृष्टीने रशियासोबत सहकार्य करण्याचा मानस आम्हाला स्पष्टपणे दिसत असल्याबद्दल अलीपोव्ह यांनी सांगितले.