हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 च्या शेवटच्या दिवशी भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. गोल्डन बॉय नीरजने ८८.१७ मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली आहे.तर पाकिस्तानच्या अरशद नदीम याला सिल्वर पदकावर समाधान मानावे लागले आहे. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.अंतिम फेरीत एकूण सहा प्रयत्न करणे बंधनकारक होते आणि नीरजने दुसऱ्या प्रयत्नामध्येच ८८.१७ मीटर लांब भाला फेकत आघाडी घेतली.त्यानंतर त्याने गुणतालिकेत ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.
अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरला ८४.७७ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
नीरजने पहिल्यांदाच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेला हा खेळाडू आता वर्ल्ड चॅम्पियनही आहे.