आज हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. राष्ट्रीय भवनात विविध खेळामध्ये पारंगत असलेल्या खेळाडूंना आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. तसेच खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. या दिवशी शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्थांमध्ये खेळांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या दिवशी क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात.
आता भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं असणार आहे. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात येते. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा सुवर्ण पदक मिळवले होते.अनेक दशकानंतही त्यांची जादू कायम आहे.हॉकी खेळामध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० हुन अधिक गोल केले होते. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तिमत्व आहे.सरकारने १९५६ मध्ये ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते.