पुणे : माणसाचे जीवनमान उंचविण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील कैवल्यधाम योगसंस्थेतर्फे आयोजित ‘स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार-२०२३’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला सीबीआयचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ.डी.आर. कार्तिकेयन, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी आदी उपस्थित होते.
व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यात योग उपयुक्त आहे. योग केवळ निरोगी शरीरासाठीचा व्यायाम नसून ही शरीर, मन आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रिया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट आंतरिक शांती, सद्भावना आणि आत्मसंयमाचा विकास आहे. त्यामुळे विविध प्रकारांच्या आजारांचे प्रमाण वाढत असताना आणि युवा पिढी व्यसनाकडे वळत असताना योगविद्येचा प्रसार अधिक महत्वाचा ठरतो असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
भारताच्या योगविद्येला आज जगाने स्वीकारले आहे. ‘योग दिवस’ साजरा करण्यासोबत आपण ‘योग सप्ताह’ साजरा करण्याचाही विचार करावा. प्रत्येक शाळा-महाविद्यालयात या संदर्भातील आयोजन करण्यात येऊन प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना योगासनाच्या मुलभूत बाबी समजाविल्या जाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.