पुणे, दि. २८: राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागाकडून यंदा उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गणेशोत्सव काळात वाहतुकीला अडथळा येणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी. मेट्रो प्रशासनाने उत्सव काळात मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत विचार करावा. गणेश मूर्तीच्या उंचीवर शासनाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही, मात्र गणेश मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण होणार नाही आणि उत्सवाचे पावित्र्य जपले जाईल याची दक्षता मंडळांनी घ्यावी. तसेच गणेश मूर्ती संकलनात जनतेच्या भावनांना धक्का लागणार नाही याकडेही लक्ष द्यावे अशा सूचना पवार यांनी यावेळी मंडळांना व पालिका प्रशासनाला दिल्या. पुण्यातील गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव समजून सर्वांनी यात सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
गणेश मंडळांकडून महानगरपालिकेने कमानीसाठी कोणताही कर आकारू नये. महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या समस्या दूर कराव्यात. प्रशासनाने नियंत्रण मनोरे स्थापित करून त्या माध्यमातून नियोजनावर लक्ष ठेवावे. पोलीस मित्रांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा. गणेश मंडळाने स्वतः नियमावली तयार करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच सर्वांनी मिळून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.
गणेशोत्सव स्पर्धेचे तपशील पुढीलप्रमाणे –
पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येणार असून एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.
अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.