अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात घेतला आक्रमक पवित्रा. यामुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाला काही कळण्याच्या आतच आंदोलकर्ते शेतकरी मंत्रालयातील जाळीवर चढून बसले व तिथेच धरणे देऊ लागले. अप्पर वर्धा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला. आम्ही अनेक दिवसांपासून निवदेन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणे आहे.
आंदोलनकर्ते शेतकरी हे धरणग्रस्त असून, त्यांच्या मागण्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी मंत्रालय गाठले आणि जाळीवर उतरून आंदोलन सुरु केले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे अप्पर वर्धा हे धरण आहे. १००हुन अधिक दिवसांपासून हे शेतकरी मोर्शी येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणे देत होते. परंतु, तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या आंदोलनाची दखलही कोणीच घेतली नाही त्यामुळे थेट मंत्रालयात त्यांनी आंदोलन सुरु केले.
अप्पर वर्धा धरणासाठी 1972 मध्ये जमिनी घेण्यात आल्या होत्या. पण या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात आला नाही. आंदोलक हे स्थानिक आहेत. पण स्थानिकांना प्रकल्पात प्राधान्याने नोकरीत घेण्यात आले नाही. त्यामुळे या आंदोलकांकडून मोर्शी तहसील कार्यालासमोर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.