मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाची विशेष भेट दिली असून घरगुती वापराचा गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर ४०० रुपयांची सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ७५ लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानुसार आता गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी त्वरेने होणार असून उद्यापासून घरगुती वापराचा गॅस स्वस्त होणार आहे. या सिलेंडरच्या किंमतीमध्ये तब्बल २०० रुपयांची कपात सरसकट लागू केली जाणार आहे .तर उज्ज्वला योजनेचे कनेक्शन ज्यांच्याकडे आहे त्यांना ४०० रुपयांची सूट मिळणार आहे.