डिजिटल आर्थिक क्षेत्रात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी मोठी उलथापालथ करणार हे बाजारातील मोठमोठ्या दिग्गजांना माहिती आहे. पण कालच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत विमा क्षेत्रातही रिलायन्स दिग्गजांना हादरवणार हे स्पष्ट झाले. यांनतर विमा क्षेत्रात मोठी क्रांती घडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे ग्राहकांना मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही डिजिटल आर्थिक सेवांसाठी स्वतंत्र कंपनी बाजारात उतरविण्यात आली असून, सद्यस्थितीत कंपनीने शेअर बाजारात अजूनही मोठा दम दाखवला नाही. पण या कंपनीचे ध्येय मात्र भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्याचे आहे. डिजिटल आर्थिक सेवामध्ये या कंपनीचे अनेक दिग्गज कंपन्यांना आव्हान असेल. पण आता ही कंपनी विमा क्षेत्रात पण मोठी उलथापालथ करण्याच्या तयारीत असून, काल रिलायन्स कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. त्यात विमा क्षेत्रात पण उतरण्याचा मनसुबा समोर आला. त्यामुळे आतापर्यंत ज्यांची विमा क्षेत्रात मक्तेदारी आहे, अशा कंपन्यांना जगाचा सक्सेस मंत्र आत्मसात करावा लागणार आहे. मरगळ झटकून ग्राहकांना अत्याधिक, आधुनिक सुविधा देणे गरजेचे आहे, नाहीतर काळाच्या ओघात या कंपन्यांचे आव्हान आणि अस्तित्व संपुष्टात येऊ शकते.