तीन दिवसीय राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा थाटात शुभारंभ; देशभरातील ५७६ खेळाडूंचा सहभाग
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावे. खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिंगत होते. समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लाभते. यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.
जवाहर नवोदय विद्यालयाद्वारे आयोजित 31 व्या राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे (‘व्हॉलिबॉल मीट’) उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालयाचे सहायक आयुक्त व क्लस्टर इंचार्ज डॉ. ए. एस. सावंत, अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू अनन्या राय, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंद्र सी.के., अकोल्याचे प्राचार्य रवींद्र चंदनशिव, सचिन खरात, नितीन शॉरीक, रवींद्र राऊत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, व्हॉलिबॉल संघटनाचे सचिव संजय बडे आदी यावेळी उपस्थित होते.
खेळांचे महत्त्व विशद करताना श्री.कटियार म्हणाले की, खेळाच्या माध्यमातून अर्थाजनासह प्रसिद्धीही कमावता येते. यासाठी खेळाडूची जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची तयारी असली पाहिजे. खेळाडूने शिस्तीचे पालन केल्यास कोणत्याही क्रीडा प्रकारात यश मिळविणे अशक्य नाही. स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे. खेळ आपल्याला सांघिक वृत्ती शिकवितो. विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील यश देशासाठी गौरवास्पद ठरते. त्याचा लाभ खेळाडूंना विविध क्षेत्रात काम करताना निश्चितच होतो.
पालकांनी पाल्यांना अभ्यासासोबतच खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच मुलींनी क्रीडा क्षेत्रात पदार्पण करताना संकोचित होऊ नये. यासाठी पालकांसह शिक्षकांनीही मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी मंचावर आलेल्या पाहुण्यांना साखळी पद्धतीने पोलीस बँड पथकाच्या शिस्तबद्ध संचालनाने त्यांचे स्वागत केले. मशालीने क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करुन क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी खेळाडूंनी सामूहिक नृत्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्हाधिकारी यांनी यावेळी खेळाडूंना प्रामाणिकपणा, खिलाडूवृत्ती, सवंगड्यांशी मैत्री व उत्साहपूर्वक निकोपपणे खेळ खेळण्याची शपथ दिली.
राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच होत असून ही स्पर्धा गुरुवार दि. 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ विभागातील म्हणजेच देशातील भोपाल, चंडीगढ, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, पटना, पुणे व शिलाँग या विभागातील 576 खेळाडू तसेच 64 एस्कॉर्ट्स व अधिकारी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे सर्व मॅचेस लिग कम नॉकआऊट पद्धतीने होणार आहे, अशी माहिती प्रास्ताविकेतून प्राचार्य ससिंदरन सी.के. यांनी दिली.
नवोदय विद्यालयाचे शिक्षक श्रीराम सिंग, अनिरुद्ध सकलकळ, विद्यार्थी धनंजय ठाकरे व विद्यार्थिनी गाथा रामटेके यांनी विविध भाषांमधून कार्यक्रमाचे संचलन केले. आभार रविंद्र राऊत यांनी मानले.