भारतीय नौदलाने 27 ऑगस्ट 23 रोजी गोवा इथे चौथ्या सागर परिक्रमा IV च्या तयारीची औपचारिक सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, या मोहीमसाठी स्वतःहून पुढे आलेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा या दोन महिला नौदल अधिकाऱ्यांना मार्गदर्शक आणि प्रशिक्षक बनवण्यासाठी, सागरी विश्व परिक्रमा पूर्ण करणारे गोल्डन ग्लोब रेसचे नायक कमांडर अभिलाष टॉमी(सेवानिवृत्त) यांच्यासोबत सागरी नौकानयन केंद्राने करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार अभिलाष टॉमी पुढच्या वर्षी भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज तारिणीवर प्रशिक्षण देऊन, परिक्रमा मोहीमेवर जाणारा चमू तयार करतील.
कर्मचारी सेवा नियंत्रक आणि भारतीय नौदल नौकानयन संस्थेचे उपाध्यक्ष व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि नौदल युद्ध महाविद्यालयालयाचे कमांडंट रिअर ऍडमिरल राजेश धनखड यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नौदलातील जवानांची मोठी उपस्थिती होती.
नौदलातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या प्रभावी सागरी नौकानयन कामगिरीबद्दल व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सागर परिक्रमा IV च्या तयारीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सागरी नौकानयनाच्या प्रयत्नांना सातत्याने पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदलाच्या वतीने कमांडर अभिलाष टॉमी यांचे आभार मानले.
येत्या काही महिन्यांत,या दोन्ही अधिकारी कमांडर अभिलाष टॉमी यांच्या प्रशिक्षणाखालील आव्हानात्मक मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेतील, या प्रशिक्षणामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरात अनेक लहान मोठ्या नौकानयन प्रवासाचा समावेश असेल. कमांडर टॉमी नौकानयन मोहिमेतील इतर सहभागींना मार्गदर्शन करतील आणि प्रशिक्षण आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींशी प्रेरणादायी चर्चा करून त्यांचे अनुभव सामायिक करतील.
‘सागर परिक्रमा IV’ हा यापूर्वी कधीही न केलेला उपक्रम असेल आणि भारताच्या सागरी नौकानयन उपक्रमाती एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.