आध्यात्मिक प्रवृत्तीचे, परमेश्वराने दिलेली परिस्थिती प्रसाद म्हणून स्वीकारलेले, अपार दयाळूपणा मनात साठवलेले खुदीराम चतर्जी आणि साक्षात योगिनी असलेली चंद्रादेवी यांच्यापोटी वयाच्या चाळिशीनंतर शांतीचा जणू सागर असलेलं, सूर्याचं तेज, चंद्राची शीतलता घेऊन एक बालक जन्माला आलं. सन 1836, 17 फेब्रुवारी रोजी. तेच आपले रामकृष्ण परमहंस.
बाळ गदाधराचे विचार, मानसिक संस्कार, आचरण, लहानपणापासून ईश्वरभक्ती, धर्माविषयी श्रद्धा बाळगणारे होते. सातव्या वर्षी वडिलांच्या निधनाने शोकाकुल परिस्थितीत वडील भावाबरोबर गदाधर कामारपुकुरहून कलकत्ता इथे दक्षिणेश्र्वरी मंदिरात राहू लागले. श्री काली देवीच्या पूजेचे काम मिळाल्यानंतर रामकृष्णांना सतत देवीच्या दर्शनाची ओढ लागलेली असे. ते व्याकूळ होऊन तळमळीने देवीला म्हणत- ” आई, आजचाही दिवस तुझ्या दर्शनावाचून गेला. एकेक दिवस निघून जात आहे. व्यर्थ काळ जातो आहे.” काम आणि कांचन हे ईश्वरी दर्शनातील अडथळे त्यांनी विलक्षण प्रयोग करून दूर केले. जगन्मातेची ज्योतिर्मयी मूर्ती त्यांना दिसत असे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य अशा भावनांनी युक्त होऊन ते मातेचे दर्शन घेत. शिष्यांच्या, साधकांच्या शंकांचे निरसन अतिशय साधी सोपी उदाहरणे देऊन करीत असत. त्यांच्यातील गुरुभावामुळे अनेक शिष्य आपणहून त्यांच्याकडे चालत आले.
त्यातील नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद तर प्रसिद्ध आहेत. सुरुवातीला नरेंद्रनाथ शंकेखोर होते. आध्यात्मिक अवस्थांचा त्यांचा विश्र्वास नव्हता; पण रामकृष्णांना त्यांच्याकडून धर्मकार्य करून घ्यायचे होते. म्हणून रामकृष्णांनी त्यांना उच्च स्थितीचा अनुभव आणून दिला आणि त्यांच्या विचारात क्रांती घडवली. 1881 च्या पुढे विवेकानंद आणि अनेक भक्तांकरवी अद्भुत लीला करीत कलकत्ता शहर, बंगाल प्रांत हलवून सोडला. या क्रांतीचे मोल अपूर्व होते.धार्मिक शिथिलतेच्या काळात बंगालात, सार्या हिंदुस्थानात आपल्या सनातन धर्माचे खरे स्वरूप प्रत्यक्ष उदाहरणांनी समजावून दिले. स्वामी विवेकानंदांकरवी धर्म जागृतीची ज्योत आजपावेतो तेवती ठेवली.
1885 साली रामकृष्ण घशाच्या आजाराने रुग्णशय्येवर होते. त्या स्थितीतही लोकसंग्रहाचे कार्य त्यांनी चालू ठेवले. रोगामुळे अत्यंत वेदना होत असतानाही वारंवार त्यांची समाधी लागायची. नातेवाईक, शिष्य, मंदिर, दृश्य – जग दूर गेलेले असे, जिवंतपणाची चिह्ने अदृश्य होत. अशा समाधी अवस्थेचे आश्चर्य महेंद्रलाल सरकार यांच्या सारख्या डाॅक्टरांना जाणवे. आपण हे जग केव्हा सोडून जाणार हे त्यांना आधीच समजले होते. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली होती.
एके दिवशी एकान्तामध्ये स्वामी विवेकानंद म्हणजे त्यांच्या नरेंद्रला बोलावून ते म्हणाले – ” माझ्याकडे होते ते सर्व तुला देऊन मी आता खऱ्या अर्थाने फकीर झालो आहे. ” रामकृष्णांनी आपली सर्व आध्यात्मिक शक्ती धर्मप्रचारासाठी स्वामी विवेकानंदांना दिली. या शक्तीचा उपयोग करून स्वामी विवेकानंदांनी वैदिक धर्माचा संदेश सार्या जगभर पसरवला. 1886 साली 16 ऑगस्टला (तिथीनुसार – श्रावण वद्य प्रतिपदा) प्रणवाचा उच्चार करीत स्वामी रामकृष्ण परमहंस सच्चिदानंदात लीन झाले. हीच त्यांची महासमाधी
आजही रामकृष्णमिशनद्वारे इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, ब्रह्मदेश, श्रीलंका अशा जगभरातील अनेक देशांत वैदिक हिंदू धर्माची शिकवण देणे, निःशुल्क औषधालये चालवणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडित लोकांना मदत करणे असे काम चालते.
रामकृष्णांच्या अवतार कार्यामुळे आपल्या देशातील धर्मग्लानी थांबली.निरनिराळे धर्म हे एकाच तत्त्वाकडे पोचण्याचे निरनिराळे मार्ग आहेत हे सर्व मनुष्यजातीसमोर मांडले गेले. बंधुत्वाची, एकत्वाची शिकवण मिळाली. पृथ्वीवर नवीन धर्मयुग सुरू झाले.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र