एका मध्यम चणीच्या सर्वसामान्य वाटणाऱ्या संगीतज्ञ मराठी तरुणाने आपल्या जीवनातील तब्बल 50 वर्षे संघ तपस्या केली आणि त्याद्वारे संघटन-क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला. या महान कर्तृत्वशाशाली व्यक्तीचे नाव आहे यादवराव जोशी. कर्नाटकात संघाचा प्रचारक म्हणून जाण्यापूर्वी यादवरावांनी क्वचितच कन्नड भाषा ऐकली असेल, पण एकदा कर्नाटकात येवून दाखल झाल्यावर त्यांनी तेथे स्वत:ला ठामपणे जोडून घेतले अणि सर्व कन्नड भाषक समाजावर आपल्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा अमीट ठसा उमटवला. त्यांनी कधीही आपले अनुयायी तयार करण्याचा खटाटोप केला नाही; परंतु त्यांच्या तप:पूत सेवाभावी जीवनक्रमामुळे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाउल ठेवून संघकार्य करू शकले. यादवरावांनी सुरू केलेल्या विविध कामांचा, संस्थांचा व्याप थक्क करणारा आहे. त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रोत्थान परिषद एकीकडे गरजू रूग्णांसाठी बेंगळुरूमध्ये सर्वांत मोठी रक्तपेढी चालवत आहे. येथे गरीब रूग्णांना सवलतीच्या दरात रक्तपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत अभ्यास वर्ग चालवले आहे. केरळमध्ये लहान मुलामुलींना भारतीय संस्कृतीशी जोडणाऱ्या बालगोकुळम् या उपक्रमाचे प्रेरणास्रोत यादवरावच होते.
Tags: NULL