राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.५ सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर सुरू होऊनही अद्याप राज्यातील काही धरणांमध्ये पुढील वर्षभरासाठीचा पुरेसा पाणीसाठा जमा झालेला नाही. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पिके, गुरांसाठी चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे, मात्र ५ सप्टेंबरनंतर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस, पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्यानं तिथं येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र असेल.त्या स्थितीचा फायदा होऊन राज्यात पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.