मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली मराठा उपसमितीची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची थेट माफी मागितली.तसेच यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. जी काही परिस्थिती मराठा आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झाली आहे त्यावर बैठकीत चर्चा झाली. जालन्यामध्ये जे उपोषण सुरु आहे तिथे दुर्दैवी घटना झाली. पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज झाला. ही दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. मी गृहमंत्री असताना दोन हजार आंदोलने झाली. तेव्हा कधीही बळाचा वापर केला नाही. त्यामुळे आता ज्यांच्यावर बळाचा वापर केल्याने जे जखमी झाले आहेत त्यांची मी माफी मागतो. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या घटनेचे राजकारण होणे योग्य नाही. काही नेते तो प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.