पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिकपणे काम करत असतात. कामाचा ताण असतांनाही ते कर्तव्यात कसूर करत नाही. त्यामुळे विभागाच्यावतीने त्यांच्यासाठी ‘मेडीटेशन’सारखे उपक्रम राबविण्यासोबतच जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.
शासकीय विश्राम भवन येथे राज्यपालांनी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला, अनेक बाबी जाणून घेतल्या. यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते.
राज्यपालांनी जिल्ह्यातील सिंचन, कृषि, खरीप हंगामाची स्थिती व विविध शासकीय योजनांची माहिती व प्रगती यावेळी जाणून घेतली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरण केले. जिल्ह्याच्या एकूनच स्थितीचा आढावा त्यांनी सादरीकरणातून राज्यपालांसमोर मांडला. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे. दरवर्षी पडणाऱ्या पावसाचा दहा टक्के भाग सुध्दा उपयोगात येत नाही. सगळे पाणी वाहून जाते. कमी खर्चात छोट्या छोट्या योजना करून पाणी कसे साठविता येईल, यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना राज्यपालांनी केल्या.
Tags: NULL