आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेला आजपासून बरोबर १ महिन्यानंतर सुरुवात होणार आहे.या स्पर्धेपूर्वी अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये आता भारतीय संघाचाही समावेश झाला आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंगळवारी विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे या संघात आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी निवडलेल्या १७ सदस्यांपैकी १५ सदस्यांचा समावेश आहे.
वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
वनडे विश्वचषक २०२३ स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत एकूण १० संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा एकूण ४५ दिवस चालणार असून स्पर्धेत १० ठिकाणी एकूण ४८ सामने खेळले जाणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध १ सामना खेळेल. गुणतालिकेतील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
भारतीय संघ विश्वचषकातील अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे. तर , भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध उतरेल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघातील नेहमीच चर्चेत राहणारा सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने 2011मध्ये अखेरचा वनडे विश्वचषक जिंकला होता. हा विश्वचषक भारताने एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली आपल्या नावावर केला होता. त्यानंतर मात्र भारताने एकही विश्वचषक जिंकला नाहीये. आता यावर्षी भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा, अशी सर्व भारतीयांना आशा लागून राहिली आहे.