राज्यात 15 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या पायाभूत सोयीसुविधा कक्षाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसंचालक विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक नितीन अंबावडकर आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, आयुष्मान भव मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम व ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत खासगी क्षेत्राचाही सहभाग घ्यावा.
Tags: NULL