आज श्रीकृष्ण जयंती. भारताच्या कानाकोपऱ्यातील माणूस हजारो वर्षांपासून भक्तीने – प्रेमाने श्रीकृष्ण चरित्राकडे आकर्षित झालेला दिसतो.
भारतीय मनाला श्रीकृष्णाचा आधार वाटतो. भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात –
” यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।”
महाभारतात वर्णन केले आहे ‘आधी संपूर्ण जग सुखी आणि प्रसन्न होते. पण मग त्याच वेळी असुर लोक राजपत्नींच्या पोटी जन्म घ्यायला लागले. कारण देवांकडून दैत्य अनेक वेळा पराभूत झाले.’ स्वर्गातून खाली येऊन अनेक दैत्य/ दानव उन्मत्त झाले होते. ते पराक्रमी तसे अहंकारी झाले होते. अनेक प्रकारची रूपे धारण करून पृथ्वीवरील चारही वर्णांच्या लोकांना त्रस्त करीत. बलवान कंस, जरासंध तर प्रसिद्ध आहेतच. दुष्टकेतू, सुबाहू, दुर्जय अशा अनेक दैत्य राजांचा उल्लेख येतो. अशा राक्षसांचा संहार हे कोणत्याही अवताराचे प्रयोजन असते.
परमेश्वरच जगाचा निर्माता – नियंता – संहारकर्ता असला, ब्रह्मा – विष्णू – महेश यांच्या रूपाने उत्पत्ती – स्थिती- लय ही कार्ये करीत असला, तरी विशिष्ट परिस्थितीत तो स्वतःच मनुष्य रूपाने भूतलावर अवतरतो. त्याला अवतार म्हणतात. ‘अवतरण’ म्हणजे खाली उतरणे. परमेश्वर जेव्हा मनुष्य रूपाने खाली उतरतो तेव्हा तो सर्व प्रकारचे मानवी व्यवहार करीत असतो. ते व्यवहार सामान्य माणसाच्या व्यवहारासारखेच दिसतात; पण ते स्वार्थासाठी होत नाहीत. लोकसंग्रहार्थ तो ते करीत असतो.
ज्ञानी पुरुषाने निष्काम आणि निरहंकारी होऊन कर्म करावे हे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी स्वतःचेच उदाहरण दिले आहे.
“न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणी।
पुढे नवव्या अध्यायात श्री भगवान म्हणतात – ‘सर्व भूतांचा महान ईश्वर असे माझे परमात्मस्वरूप न जाणणारे मूढ लोक- अविवेकी लोक- मनुष्य देहाचा आश्रय केलेल्या मला कमी लेखतात.’
तात्पर्य काय की मनुष्याप्रमाणे कर्म करणारे, दीन दुबळ्यांना प्रेम देणारे, दुष्टांचा संहार करणारे भगवान श्रीकृष्ण सगुण साकार ब्रह्मच आहेत.
भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा साधूंचे रक्षण, दुष्टांचा विनाश, आणि धर्म संस्थापना करण्यासाठी झालेला जन्म होय.( धर्म म्हणजे जीवनमूल्यांचे आचरण करण्यासाठी केलेले कर्तव्य. )
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।
सौ. मीरा जोशी.
सौजन्य – समिति संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत