‘शासन आपल्या दारी’, या अभियानातून लोकोपयोगी योजनांचा लाभ थेट जनतेच्या घरात पोहोचावा, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या मोहिमेला नागपूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पुढे आले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा पिंजून काढणे सुरू केले असून नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला 20 लाख लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नागपूर जिल्ह्यात कार्यक्रम घ्यायचा असेल तर 20 लाख लाभार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचायला हवे, अशी साद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाला घातली आहे. त्यामुळे प्रशासन गतीने कामाला लागले असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जावा, यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर 2 दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे उद्दिष्ट या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाच्या सुरुवातीलाच निश्चित केले होते. त्यावेळी मोजक्या कालावधीसाठी हे अभियान निश्चित करण्यात झाले होते.
कालावधी वाढविल्यानंतर जिल्ह्यात या अभियानाची बांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाची पायाभरणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये केली आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणा, उमरेड, काटोल, नरखेड, रामटेक, मौदा या सहा उपविभागात बैठकी घेऊन जिल्हा पिंजून काढला. त्यामुळे 75 हजार लाभार्थी उद्दीष्ट जून महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण झाले आहे. तर नागपूर महानगरातील विधानसभानिहाय लाभ पोहोचविण्यासाठी आयोजन सुरू आहे. नुकताच मध्य नागपुरातील मेळावा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. अन्य ठिकाणच्या आयोजनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बारकाईने नियोजन सुरू आहे.
तथापि, या योजनेतून शाश्वत विकासाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढावी, कायमस्वरूपी रोजगार, घरे, व्यवसाय, नोकरी, रस्ते, पाण्याचे स्त्रोत, सौर ऊर्जेची उपलब्धता, विजेचे कनेक्शन, घरांचे पट्टे, कृषी योजनेतून दीर्घकाळासाठी कामी पडणाऱ्या यंत्रसामुग्रीचे आरोग्य यंत्रणेचा मोफत लाभ, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार, अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्य योजना, गाव तिथे स्मशानभूमी अशा शेकडो कायमस्वरूपी उपयोगी येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याकडे शासन प्रयत्नशील आहे. काही समस्या या माध्यमातून कायमस्वरूपी सुटाव्यात हा देखील या अभियानाचा उद्देश आहे.