गोकुळात नंदाच्या घरी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. सर्व गोकुळ सडासंमार्जन करून फुला – माळांनी सजवले होते. गोपगोपी नटूनथटून नंदाच्या घरी आले आणि त्यांनी शिशूला आशीर्वाद दिले. नंद मथुरेत कर देऊन गोकुळात परतला आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीलांना प्रारंभ झाला. पुतनेचा प्राण याने घेतला तेव्हा हे तर नव्यानेच जन्मलेले लहान बाळ होते, तीन महिन्यांचा असताना याने शकटासुराचा वध केला, तृणावर्ताचा वध केला त्यावेळेस तो एक वर्षाचा होता आणि गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा सात वर्षांचा! दुष्टांचा संहार करणाऱ्या अशा लीला भगवंतानी लहानपणीच दाखवल्या आहेत.
हळूहळू बलराम कृष्ण रांगायला लागले – चालायला लागले! आता हे बाळ वासरांना त्यांच्या शेपट्या धरून पळवीत. शिंक्यातील दही – दूध – लोणी खाणं, दूध – लोणी सवंगड्यांना खाऊ घालणं,वासरांना अवेळी सोडून देणं, माठ – मडकी फोडणं अशा कृष्ण-लीला दाखवू लागले. ‘माखनचोर’ हे कृष्णाचं कौतुकाने ठेवलेलं नाव. या सगळ्या गोष्टी आनंददायक आहेत. गोपी कागाळ्या करीत तेव्हा यशोदाही कौतुकाने हसत असे.
यशोदामाईने एकदा बालकृष्णाला माती खाताना पाहिले. विचारल्यावर तो म्हणू लागला की – “माई, मी नाही माती खाल्ली. समक्ष पश्य मे मुखम्!” तूच पहा तर मी खाल्ल्येय का माती.
असे म्हणून बाळकृष्णाने तोंड उघडले तो यशोदेला सारे चराचर विश्र्व त्याच्या मुखात दिसले.उलुखबंधनाचा प्रसंगही वात्सल्यभावाने ओथंबलेला दिसतो.
यशोदा कृष्णाच्या खोड्यांनी त्रस्त होऊन त्याला उखळाला बांधायला निघाली. कितीतरी दावी एकमेकांना जोडली तरी ती पुरेनात. यशोदा थकली. शेवटी कृष्णाने आपणच बंधन स्वीकारले. मनुष्यरूप धारण केल्यामुळे भगवंताशी साधारण बालकाप्रमाणे वात्सल्याने यशोदा वागत असे.
हळूहळू श्रीकृष्ण-बलराम आणखी थोडे मोठे झाल्यावर सवंगड्यांबरोबर गायी-वासरे चारायला नेऊ लागले आणि वनातील क्रीडा सुरू झाल्या. वत्साचं रूप घेऊन वासरांमध्ये शिरणाऱ्या वत्सासुराचा, बगळ्याचं रूप घेऊन झडप घालणाऱ्या बकासुराचा वध खेळता खेळता श्रीकृष्णांनी लीलया केला.
गोपबालकांबरोबर श्रीकृष्णांनी वनात खेळलेले खेळ, शिवाशिवी, लपाछपी, त्यांची पानाफुलांनी सजवलेली मनोवेधक वेशभूषा, त्यांचे वनभोजन, पक्ष्यांचे आवाज, माकडांचे अनुकरण हा सगळा आजही भक्तांच्या आनंदाचा ठेवा आहे.
कविवर्य वामनपंडित या क्रीडांचे फार सुरेख वर्णन करतात –
वनी खेळती बाळ ते बल्लवांचे। तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे।
फुलांचे गळा घालिती दिव्य हार। स्वनाथासवे ते करीती विहार।
शिरी बांधिती मोरपत्रे विचित्रे। शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे।
गोपबालकांचे असे बालसुलभ खेळ सुरू असताना अघासुर नावाचा बलवान दैत्य तिथे आला. श्रीकृष्णांनी त्याचा वध केलाच, पण त्याच्याशी लढताना गतप्राण झालेल्या संवगड्यांना भगवान श्रीकृष्णांनी जिवंत केले. त्यांना आपापल्या शिदोर्या सोडण्यास श्रीकृष्ण सांगतात याचे वर्णन वामनपंडित फार बहारदार करतात –
वदे कृष्ण गोपाळ बाळा जनाते, बसूनी करू ये स्थळी भोजनाते.
वनी वत्स सोडा चरायासि पाणी, तया पाहुनीया म्हणे चक्रपाणि.
मुलामध्यभागी बसे कृष्ण जेवी –
मुखी ग्रास सप्रेम घालून हाती, दहीभात दे देव लीला पहाती.
भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेले सगळे भक्त आजही दहीकाला – दहीहंडी करून आनंद घेताना दिसतात.
सौ. मीरा जोशी
सौजन्य – समिती संवाद ,पश्चिम महाराष्ट्र