जी २० परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगातील विविध नेत्यांसोबत १५ हून अधिक द्विपक्षीय बैठका होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी तीन बैठका आज ८ सप्टेंबर रोजी अमेरिका, बांगलादेश व मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत होणार आहेत तर, चार बैठका ९ सप्टेंबर रोजी ब्रिटन, जपान, जर्मनी आणि इटली यांच्या नेत्यांसोबत होतील. तर, उर्वरीत आठ बैठका १० सप्टेंबर रोजी होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना व मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जग्गनाथ यांच्याशी चर्चा करतील. “आज संध्याकाळी मी माझ्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठकांसाठी उत्सुक आहे,” असे पंतप्रधान मोदींनी या तीन नेत्यांचा उल्लेख करत एक्स वर ट्विट केले आहे.
“या बैठकींमुळे भारताच्या या राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत
बांगलादेश पुढील वर्षी निवडणुकांना सामोरे जात आहे, जे शेख हसीना यांच्याशी भारताचे असलेले जवळचे संबंध लक्षात घेऊन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.तेथील विरोधी पक्ष, खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली असलेला बांगलादेश नॅशनल पार्टी हा भारताच्या हितसंबंधांसाठी तितकासा अनुकूल नाही असे मानले जाते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांच भारतात येत आहेत.राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या दौऱ्यापूर्वी भारत आणि अमेरिका द्विपक्षीय बैठकीशी संबंधित अनेक महत्त्वकांक्षी योजनांवर सध्या काम चालू आहे. राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या यावेळच्या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देश संभाव्य अणुकरारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. याशिवाय ड्रोन डील आणि जेट इंजिनवरील बाबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकन काँग्रेसच्या मंजुरीवरील प्रगतीवरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे .
Tags: NULL