महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज धुवांधार पाऊस पडत आहे . हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली असून पुढच्या काही तासांसाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.
गोपाळकालाच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. गुरुवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, आज शुक्रवारी हा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने ८ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्याला जारी करण्यात आलेला यलो अलर्ट रविवारपर्यंत कायम राहणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डाॅ. कृष्णानंद होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, येत्या तीन ते चार तासांत कोकण किनारपट्टीसह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरीत महाराष्ट्रातही पावसाचे ढग जमा झाले आहेत, असे हवामान खात्याने म्हंटले आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. याशिवाय धरणांमधीलपाणीसाठा संपत आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. पाऊस पडला नाही तर भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वजण पाण्याची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर सर्वांची हाक पावसाने ऐकली आणि गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने हजेरी लावली आहे. अजूनही हवा तितक्या स्वरुपात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.त्यामुळे आता पावसाचे सातत्याने येणे आवश्यक आहे.