आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. कौशल विकास घोटाळ्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आज पहाटे सीआयडीच्या विशेष पथकाने नायडू यांना नंदयाला जिल्ह्यातून अटक केली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये घोटाळा केल्याच्या आरोपावरून सीआयडीने ही कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं आता चंद्राबाबू नायडू यांची घोटाळा प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. सीआयडीने चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश यालाही गोदावरी जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे
चंद्राबाबू नायडू यांच्यावर भादवि 120B (criminal conspiracy), 420 (cheating and dishonestly inducing delivery of property) आणि 465 (forgery) कलम लावण्यात आले आहे.तसेच सीआरपीसी कलम 50(1)(2) अंतर्गत चंद्रबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये युवांना रोजगार देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट योजना आणली होती. कौशल विकास प्रशिक्षण अंतर्गत तरुणांना नोकरीसाठी तयार करण्याची ही योजना होती. यामध्ये अनेक कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू सरकारवर आहे तसेच त्यासंदर्भातील कागदपत्रेही संपवल्याचा आरोप आहे.
२०२१ साली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २५० कोटींच्या घरात या घोटाळ्याचा आकडा असून चंद्राबाबू नायडू या प्रकरणात आरोपी क्रमांक एक आहेत. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे ही अजामीनपात्र असल्यामुळे आंध्रप्रदेशच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.