शिकागो सर्वधर्म परिषदेची संकल्पना
अमेरिकेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रचंड आर्थिक विकास आणि प्रगती झालेली होती. त्या जोरावर अमेरिका देश ही एक जागतिक महासत्ता बनलेला होता. यासंबंधी अमेरिकेतील जनतेला प्रचंड अभिमान वाटत होता. हे यश साजरं करण्यासाठी एक समारंभ करावा असा विचार अमेरिकेत चालू होता. ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यास १८९३ साली ४०० वर्षे पूर्ण होणार होती. या निमित्ताने अमेरिकेतील सुबत्तेचे, प्रगतीचे जगातील सर्वांना दर्शन घडवावे या हेतूने वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रदर्शनी लावण्याचे ठरले. तसेच जगातील सर्व धर्मांमध्ये ख्रिस्ती धर्मच कसा श्रेष्ठ आहे हे सगळ्यांच्या मनावर बिंबविण्याचा हेतू मनात ठेवून प्रदर्शनी संयोजन समितीने सर्व प्रमुख धर्मांना बोलावून सर्वधर्म परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविले. अशा पद्धतीची सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी शिकागो येथे सर्वधर्म परिषदेचे आयोजन होते आहे ही बातमी सर्व देशांत पसरवली गेली.
स्वामी विवेकानंदांची सर्व धर्म परिषदेत सहभागाची तयारी
स्वामी विवेकानंद जेव्हा परिव्रजक अवस्थेत भारत भ्रमण करत होते तेव्हाच जुनागढ संस्थानच्या महाराजांकडुन त्यांना सर्वधर्म परिषदेच्या आयोजनाची बातमी समजलेली होती. स्वामीजींचे हिंदू धर्म, वेदान्त याविषयीचे सखोल ज्ञान पाहता जे कोणी त्यांना भेटत ते स्वामीजींनी सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जावं असं सुचवत होते. यात म्हैसूरचे महाराज तसेच रामनदचे राजे आणि दक्षिणेतील काही विद्वानांचा समावेश होता. यात रामनदच्या महाराजांनी तसेच जुनागढच्या राजांनी त्यांचा अमेरिकेत जाण्यासाठीचा आणि तेथील सर्व खर्च करण्याचे सुचविले होते. पण स्वामी विवेकानंदांनी या सगळ्यांना विनम्रपणे नकार दिला. सर्वप्रथम त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी गुरुंची परवानगी, जगन्मातेचा कौल मिळावा अशी स्वामीजींची इच्छा होती. दुसरं कारण म्हणजे त्यांना या लोकांच्या खर्चाने जाणे म्हणजे त्यांचे प्रतिनिधी बनून जाणे मान्य नव्हते. तिसरं कारण म्हणजे अमेरिकेसारख्या देशात इतक्या दूर फक्त एका परिषदेसाठी जाणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. तिथे जाऊन आपण काय कार्य करायचे त्याची स्पष्टता त्यांना आलेली नव्हती.
पण यथावकाश त्यंना स्वप्नाद्वारे गुरु श्रीरामकृष्णांच्या परवानगीचे संकेत मिळाले. येवढ्या मोठ्या सागरी प्रवासास शारदामातांची परवानगी आणि जगन्मातेचा कौल असे सर्वच मिळाले. अमेरिकेतील प्रवासाचा खर्च उभा करण्यासाठी त्यांनी जनतेमध्ये विविध ठिकाणी वेदान्त तत्वज्ञान, हिंदूधर्म, भग्वतगीता यांवर व्याख्याने दिली. काही व्याख्यानां मधुन त्यांनी अमेरिकेत जाऊन आपण काय कार्य करणार आहोत याची रुपरेखा देखील सगळ्यांना सांगीतली. या व्याख्यानांचे आयोजनास मान्यवर लोकांनी म्हणजेच जुनागढचे राजे, म्हैसुरचे महाराज, रामनदचे राजे आणि अलासिंगा पेरुमल सारख्या दक्षिणेतील शिष्यांनी खूप मोलाची मदत केली. या सगळ्यांचे आभार स्वामीजींनी अमेरिकेतून परतल्यावर केलेल्या सत्कार सोहळ्यांना उत्तर देताना जाहीरपणे मानलेले होते. त्यामुळे स्वामीजी या सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून शिकागोला जाण्यासाठी सज्ज झाले.
भारतात त्यावेळी ब्रिटीशांचे राज्य असल्याने या राजे-महाराजे लोकांना ब्रिटीश सत्तेचे देखील भय होतेच. त्यामुळे त्यांनी थेट आर्थिक मदत न करता अतिशय सावधपणे व्याख्यानांचे आयोजन, त्यांचा प्रवास खर्च, त्यांच्या कपड्यांचा खर्च अशी टप्प्या टप्प्याने मदत केली जेणेकरुन ती मदत ब्रिटीशांच्या डोळ्यावर येणार नाही. स्वामीजी तर आपल्या बहुआयामी बुद्धिमत्तेमुळे सर्वदूर प्रसिद्ध झालेले होतेच. त्यामुळे त्यांचे मनोबलही खूप उंचावलेले होते. जहाजाने प्रवास करताना स्वामीजी मधेच सिलोन, चीन, हॉंगकॉंग, जपान आणि शेवटी व्हॅंकुव्हर इत्यादी ठिकाणी उतरले. या प्रवासात त्यांनी सिलोन, चीन आणि जपान मधील संस्कृती आणि धर्म जवळुन पाहिले. कॅंटन, क्योटो येथील प्राचीन मंदिरे पाहिली आणि हॉंकॉंगमधील प्राणी बाजार, गरीब जनता यांचाही अनुभव घेतला. यामुळे त्यांचे भारताबाहेरील बौद्ध धर्माचे आकलनही वाढले. व्हॅंकुव्हर ते शिकागो हा प्रवास त्यांनी तीन दिवस आगगाडीने केला.
शिकागो सर्वधर्म परिषदेतील सहभागापूर्वी आलेल्या अडचणी
स्वामीजी साधराणपणे जुलैच्या मध्यावर म्हणजे सर्वधर्म परिषदेच्या दीड महिना आधीच शिकागोला पोहोचले. त्यांनी तिथे मांडलेल्या सर्व प्रदर्शनांना हजेरी लावली. अमेरिकेची विज्ञान-तंत्रज्ञानामुळे झालेली भौतिक प्रगती पाहून त्यांना त्यातील सशक्तपणा जाणवला. काही दिवसांतच त्यांना वंशभेद आणि रंगभेद देखील अनुभवास आले. प्रदर्शना निमित्त भरलेल्या बाजारांत वस्तुंच्या महागड्या किंमतींबरोबरच त्यांच्याकडुन अधिक पैसे घेऊन त्यांची लूट केली गेली. हे सगळं आयोजन ख्रिस्ती धर्मच कसा सर्वश्रेष्ठ आणि अमेरिका कशी महासत्ता आहे याचे प्रदर्शन करण्यासाठी होते हे स्वामीजींना लक्षात यायला वेळ लागला नाही. भारतातून शिकागोसाठी निघताना त्यांना सर्वधर्म परिषदेतील सहभागास परिचयपत्रं लागेल याची कल्पना देखील नव्हती. जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी आपला मुक्काम महिन्याभरासाठी जवळच्या बॉस्टन शहरात हलवला. तिथेच त्यांची भेट श्रीमती सॅनबोर्न यांच्याशी झाली. त्यांच्यामार्फत त्यांनी बॉस्टन मॅसॅच्युएट्स भागात भारतीय स्त्रीयांचे जीवन, हिंदू तत्वज्ञान, भारतीय संस्कृती, वेदांत, ब्रिटींश राजवटीचा भारतीयांवर अन्याय इत्यादी विषयांवर व्याख्याने दिली. यातूनच त्यांना अमेरिकन जनतेची नस सापडली. त्यांच्या अमोघ आणि विद्वत्तापूर्ण वक्तृत्वामुळे त्यांची प्रसिद्धी वाढत होती. श्रीमती सॅनबोर्न यांच्या मार्फतच त्यांची हार्वर्ड येथील प्राध्यापक जॉन राईट यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्यामुळे सर्वधर्म परिषदेतील सहभागाचे परिचयपत्र मिळाले तसेच त्यांची शिकागो पर्यंतच्या प्रवासाची आणि सर्वधर्म परिषदेच्या निवासाची व्यवस्था झाली. पण बॉस्टन ते शिकागो या प्रवासात स्वामीजींकडुउन सर्व धर्मपरिषदेच्या आयोजकांचा पत्ता हरवला. ही अडचणही शिकागोत उतरल्यावर परमेश्वरी कृपेनेच दूर झाली.
सर्वधर्म परिषदेतील सहभाग
११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील सर्वधर्म अरिषदेचे उद्घाटन झाले. स्वामीजींनी पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात शेवटी शेवटी भाषण केले. स्वामीजींनी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्गारलेल्या “अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुंनो” शब्दांनी संपूर्ण प्रेक्षागाराचे मन जिंकून घेतले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वामीजींच्या वकतृत्वाची लोकप्रियता तेथील अमेरिकी जनतेमध्ये पसरलेली होती. शिकागोत असताना प्रत्यक्ष परिषदेतील व्याख्याने, विज्ञान सत्रातील व्याख्याने, स्वागतास उत्तर म्हणून दिलेली व्याख्याने याशिवाय काही स्वागत समारंभांमध्ये दिलेली व्याख्याने अशी मिळून जवळ जवळ २० व्याख्याने दिली असतील. त्याचे विषयही हिंदू धर्म, भारतीय स्त्रियांची स्थिती, आपले मतभेद का आहेत>, धर्म ही भारताची निकाड नाही, बुद्धाच्या शिकवणुकीवर, वेदान्त तत्वज्ञान इ. होते. परिषदेच्या शेवटी स्वामीजींनी विश्वधर्माची संकल्पना मांडली आणि म्हणून ते विश्वबंधुत्वाचे प्रणेतेही ठरले. स्वामीजींना सर्वधर्म परिषदेत जरी यश मिळाले असले तरी नंतर पुढे अमेरिकेत राहून त्यांनी व्याख्याने देऊन पाश्चात्यांना वेदांत आणि आध्यात्म शिकवुन आपल्या भारतातील कार्यासाठी पैसे उभे करायचे होते. त्यातच रेव्हरंड मुजुमदार आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रतिनिधींसारख्या झारीतील शुक्राचार्यांमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मुजुमदारांनी तर विवेकानंदांना कोलकत्यातील एक अभिनेता असेच संबोधले. बॉस्टन येथे असलेल्या रमाबाई सर्कल या संस्थेने स्वामीजींविषयी घृणास्पद अफवा पसरवुन स्वामीजींना खूप त्रास दिला. कारण पंडिता रमाबाईंनी स्वत:च्या अनुभवांवर आधारित कथनाचा या ख्रिस्ती मिशनरी बायकांनी केलेल्या गैरवापराच्या विरोधात व्याख्याने दिली. अमेरिकेत असताना अशाच एका व्याख्यान आयोजित करणार्या ब्युरोने त्यांना फसविले होते. अमेरिकेतील ख्रिस्ती मिशनरी लोकांनी ते आपल्या व्याख्यानांतून हिंदू धर्माचा प्रसार करत आहेत म्हणून प्रचंड त्रास दिला.
अमेरिकेतून भारतात परतल्यावर
स्वामीजींनी शिकागो सर्वधर्म परिषदेनंतर दोन-तीन वर्षे अमेरिकेतच राहून काम केले. त्यांचा स्वत:चा शिष्यवर्ग उभा केला. तरीही स्वामीजीं विरुद्धचा मिशनर्यांनी चालविलेला अपप्रचार कमी ह्त नव्हता. स्वामीजींनी आपल्या गुरुबंधुंना आणि आलासिंगा पेरुमलला भारतातच सभा घेऊन स्वामीजी हे भारतीय जनतेचा प्रतिनिधी आहेत हे सभांमध्ये ठराव रुपाने मान्य करुन त्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांत छापून आणण्या विषयी सांगीतले होते. त्या छापलेल्या वृत्तांची कात्रणे स्वामीजींना पाठवून देण्यास सांगीतलेली होती. त्याप्रमाणे त्यांनी केलेही पण स्वामीजींचा पत्ता सारखा बदलत असल्याने ही कात्रणे त्यांना खूप उशिरा मिळाल्याचा संदर्भ एस एन धर यांनी लिहीलेल्या द्वितीय खंडातील आठव्या प्रकरणात दिलेलाआहे. अमेरिकेतून येता येता ते इंग्लंडमध्ये ही थांबले होते आणि तिथेही त्यांचे काम चालू केले. त्याच वास्तव्यात त्यांना कु. मार्गारेट नोबल (भगिनी निवेदीता) सारख्या समर्पित शिष्या मिळाल्या. भारतात परतल्यावर कोलंबोपासून, मद्रास आणि कोलकत्यापर्यंत सर्वत्र त्यांचे जोरदार स्वागत झाले. काही ठिकाणी तर लोकांनी त्यांना आपल्या खांद्यावर बसवुन त्यांची मिरवणुक काढली. ब्रिटीशांनी स्थानिक धनिकांवर, राजांवर वर्च्यस्व प्रस्थापित केल्यामुळे स्वामीजींच्या कामासाठी जमीन देण्याचा निर्णय देखील ब्रिटीश अधिकारीच घेत असत. पण पाश्चात्यांना जमिन खरेदीस अडचण येत नसे. म्हणूनही बेलूर मठ आणि अद्वैताश्रमासाठीच्या जागा या त्यांच्या पाश्चात्य शिष्यांनी खरेदी करुन स्वामीजींना दिल्या असाव्यात असेही आपण म्हणू शकतो. स्वामीजींची किर्ती शिकागोतील सर्वधर्म परिषदेपासून पाश्चात्य देशांत पसरली. स्वामीजींनीच पाश्चात्य देशांत हिंदू धर्म, वेदांत तत्वज्ञान सर्वदूर पोहोचवले. म्हणून हा दिवस विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. ११ सप्टेंबर २०२३ ला या ऐतिहासिक घटनेस तब्बल १३० वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून हा लेख.
———– डॉ. अपर्णा लळिंगकर
(लेखिका विवेकानंद साहित्याच्या अभ्यासक, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आहेत.)
सौजन्य – समिती संवाद , पश्चिम महाराष्ट्र